कोलोंबो – श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोटाबाये राजपक्षे हे आज आपल्या कुटुंबियांसमवेत दुबईला रवाना झाले. राजपक्षे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी लोमा, मुलगा मनोज, सून सेवंदी आणि नातू डारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला रवाना झाले, असे सूत्रांनी सांगितले. तीन महिन्यांपूर्वी श्रीलंकेला परतल्यापासून ते प्रथमच परदेशात गेले आहेत.
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी मोदींची फोनवरून चर्चा
जुलै महिन्यात श्रीलंकेतील अस्थिर राजकीय आणि आर्थिक विपन्नावस्थेच्या पार्श्वभुमीवर राजपक्षे मालदिवला पळून गेले होते. तेथून ते सिंगापूरला निघून गेले होते. तेथूनच 14 जुलै रोजी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवून दिला होता. तेथे काही आठवडे राहिल्यानंतर ते थायलंडला निघून गेले आणि तेथे त्यांनी तात्पुरता राजकीय आश्रय मागितला होता. मात्र उच्चपदस्थ पासपोर्टधारक असल्यामुळे त्यांना केवळ 90 दिवसांच्या मुक्कामाची परवानगी थायलंड सरकारकडून मिळाली होती.
या मुक्कामाच्या कालावधीमध्ये कोणत्याही राजकीय कार्यक्रमात सहभागी न होण्याचे निर्बंध त्यांच्यावर घालण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात ते थायलंडवरून परतले आणि त्यांना सुरक्षा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबियांकडे श्रीलंका आणि अमेरिका अशा दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. 2019 च्या निवडणुकीच्या पूर्वी राजपक्षे यांनी अमेरिकेचे नागरिकत्व सोडून दिले होते.