पुणे – जेजुरीतील माजी नगरसेवक मेहबुब पानसरे यांची शुक्रवारी सायंकाळी जमिनीच्या वादातून कोयता आणि कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आली. यामध्ये पाच ते सहा आरोपींचा सहभाग होता. यातील दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. वनीस प्रल्हाद परदेशी (रा. बेंद वस्ती, जेजुरी) आणि महादेव विठठल गुरव ऊर्फ काका परदेशी ( रा. ता. फलटण, जि. सातारा ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया सुरु आहेत. त्या अनुषंगाने पुणे शहर परिसरात गुन्हे शाखेतर्फे कोम्बिग ऑपरेशन, गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग, नाकाबंदी, सराईत गुन्हेगारांची चेकींग मोहिम कारवाई सुरु करण्यात आली होती. उप आयुक्त अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार खंडणी विरोधी पथक-2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांची दोन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. दरम्यान जेजुरी येथील खुनातील आरोपी डेक्कन परिसरात आल्याची खबर मिळाली. त्यानूसार डेक्कन परिसरातुन शोध घेवुन त्यांना पकडण्यात आले. तपासात त्यांनी खूनाच्या गुन्ह्याची कबुली दिल्यावर त्यांना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यात आले.
… असा झाला खून
नाझरे परिसरात पानसरे यांची शेती आहे. त्यांच्या शेतीच्या मशागतीचे काम सुरु होते. त्याचवेळी परदेशी आणि पानसरे यांच्यात शेतीवरुन वाद झाले. हे वाद इतके विकोपाला गेली की परदेशी आणि त्यांच्या दोन मुलांनी पानसरेंवर कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले. त्यांना तातडीने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र घाव जिव्हारी लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.