नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेस नेते योगानंद शास्त्री राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गळाला लागले आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत शास्त्री यांनी आपल्या “हाता’वर राकॉंचे “घड्याळ’ बांधले असून शास्त्री यांना दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष बनविले जाणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये आलेले योगानंद शास्त्री यांना दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष बनविले जाणार आहे. राकॉं अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी बुधवारी पक्षांतर केले होते. आगामी काळातील विधानसभा आणि दिल्लीतील महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार उतरविण्याची राकॉंची तयारी आहे. याची सुरवात शास्त्री यांच्या आगमनाने झाली आहे.
राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेताच योगानंद शास्त्री यांनी कॉंग्रेसवर तोंडसुख घेतले. “जी माणसं लोकांसोबत जुळलेले नाही अशांना कॉंग्रेसमध्ये पुढे केले जात आहे. पंजाब याचे ताजे उदाहरण आहे. यामुळे कॉंग्रेसमध्ये राहणे फार अवघड झाले आहे, अशा शब्दात शास्त्री यांनी शरसंधान साधले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्षासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत. परंतु, त्यांच्या अवतीभवतीची मंडळी कॉंग्रेसशी प्रामाणिक नाही, असेही ते म्हणाले.
महत्वाचे म्हणजे, शास्त्री यांनी 2019 मधील दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी सुध्दा कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता. परंतु, त्यावेळेस राजीनामा नामंजूर करण्यात आला होता. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या काळात शास्त्री यांनी सरकारमध्ये विविध पदे सांभाळली होती, हे येथे उल्लेखनीय. शास्त्री यांनी आतापर्यंत सहा वेळा विधानसभेची निवडणूक लढविली आणि तीनवेळा विजयी झाले होते.