पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) – दिघीगाव व उपनगरांममधील विस्कळीत पुरवठ्याकडे लक्ष्य वेधूनही महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऐन दिवाळीतही पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे माजी नगरसेवक विकास डोळस यांनी दिवाळीभेट म्हणून महापालिका प्रशासनाला बिनपण्याचा मोकळा हंडा भेट देऊन प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.
याबाबत पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना निवेदन दिले. माजी नगरसेवक कुंदन गायकवाड उपस्थित होते. निवेदनात माजी नगरसेवक डोळस यांनी म्हटले आहे की, दिघीगाव व उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर होत असल्याबाबत महिन्याभरापूर्वी पत्र दिले होते. तरीही ऐन दिवाळीत अगदी वसुबारसेपासून आजपर्यंत दिघीत पाण्याची समस्या जैसे थे आहे. आयुक्त शेखर सिंह आल्यानंतर पाणीपुरवठा विभाग ढिला आणि गलथान झाला आहे. खूप मेहनतीने प्रभागातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी शून्यावर आणल्या होत्या. पण, प्रशासकीय राजवटीत प्रभागातील पाणीपुरवठा विस्कळीत करुन प्रशासनाने आमच्या कामावर पाणी फिरवले आहे.