पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) -रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर राडारोडा टाकणे, बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणे, कचरा जाळणे, पाळीव प्राण्यांव्दारे अस्वच्छता करणे यासह विविध दंडात्मक कारवाईसाठी महापालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयांसाठी ग्रीन मार्शल पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांच्यामार्फत महापालिकेला अवघ्या नऊ महिन्यांत तब्बल सव्वा कोटी रूपये मिळाले आहेत.
शहराची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबर विविध समस्याही आ वासून समोर उभ्या आहेत. शहरात सुशिक्षित व अशिक्षित दोन्ही वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या दोन्ही वर्गातील नियम मोडणाऱ्यांची संख्याही तितकीच आहे. एकीकडे केंद्र सरकार 2016 पासून देशात स्वच्छ भारत अभियान राबवत असताना शहराचा गेल्या दोन वर्षांपासून 19 वा क्रमांक कायम आहे. शहर स्वच्छ होण्यासाठी प्रशासनासह सुज्ञ नागरिकांचीही तितकीच महत्वाची जबाबदारी आहे. 2023 च्या स्वच्छ भारत अभियानासाठी महापालिकेने कंबर कसली असताना नियमांची ऐशी-तेशी करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक ग्रीन मार्शल पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
या पथकांमार्फत गेल्या नऊ महिन्यात रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर राडारोड टाकणे, बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणे, कचरा जाळणे, पाळीव प्राण्यांव्दारे अस्वच्छता करणे यासह विविध नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत पालिकेने सव्वा कोटी रूपये वसुल केले आहेत.
नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एका ग्रीन मार्शल पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांमार्फत नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या नऊ महिन्यांत या पथकाने तब्बल सव्वा कोटी रूपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच शहर स्वच्छ रहावे, यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे.
– गणेश देशपांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी