नगर -लॉकडाऊनच्या काळातील व पुढील 6 महिने सर्व शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टॅक्स, इन्शुरन्स, फिटनेस, परवाना मुदत संपलेल्या कालावधीपासून पुढे शाळा सुरु होईपर्यंत विनामोबदला ग्राह्य धरण्यात यावा. लॉकडाऊनच्या काळात बॅंकेच्या हप्त्यावरील व्याज संपूर्ण माफ करावे. अशी मागणी अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाच्या वतीने करण्यात आली.
याबाबत निवेदन शहर वाहतूक सेनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना दिले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, वाहतुक सेनेचे शहराध्यक्ष संजय आव्हाड, ऍड.विनायक सांगळे, रमेश सानप आदी उपस्थित होते.
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, करोनासारख्या महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शाळा सुरु होण्याची शक्यता निश्चित नसल्याने शालेय वाहनांना प्रवाशी व माल वाहतूक करण्याची मुभा मिळावी, त्यासाठी वेगळी आकारणी करु नये. 8 वर्षावरील वाहनांची फिटनेस तपासणी कालावधी 2 वर्षांचा करावा. स्कूलबसचे आयुमर्यादा 15 वर्षांची आहे ती 20 वर्षे करावी. परमिट धारकांना मासिक मानधन मिळावे. बॅंक हप्त्यांना मुदत वाढून मिळावी. कर्जावरील व्याज माफ करावे असे निवेदनात म्हटले आहे.