न्यूयॉर्क – प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या फोर्ब्सच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या 5 महिलांनी स्थान पटकावले आहे. “अमेरिकाज रिचेस्ट सेल्फ मेड वुमेन’च्या 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये या भारतीय वंशाच्या महिलांचा समावेश करण्यात आला आहे.
यावर्षी फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीमध्ये नवीन 15 जणांचा समावेश झाला आहे. त्यामध्ये पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी इंद्रा नूयी, अरिस्टा नेटवर्कच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी जयश्री उल्लाल, सिंटेलच्या सहसंस्थापिका नीरजा सेठी, कॉन्फ्लुएंटच्या सहसंस्थापिका आणि माजी मुख्य टेक्नोलॉजी अधिकारी नेहा नारखेडे आणि गिंको ब्लोवर्क्सच्या सहसंस्थापिका रेश्मा शेट्टी यांचा समावेश करण्यात आला आहे.
लंडनमध्ये जन्मलेल्या 60 वर्षीय जयश्री उल्लाल या 2008 पासून एरिस्टा नेटवर्क या संगणक नेटवर्किंग फर्मच्या प्रमुख आहेत. उल्लाल यांचे बालपण भारतात गेले, त्यांची संपत्ती 1.7 अब्ज डॉलर इतकी आहे आणि फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्या 16 व्या स्थानावर आहेत.
नीरजा सेठी यांची संपत्ती 1 अब्ज डॉलर इतकी आहे आणि त्यांचा फोर्ब्सच्या यादीतील क्रमांक 26 वा आहे. पती भारत देसाई यांच्याबरोबर मिळून त्यांनी मिशिगनमधील आपल्या अपार्टमेंटमध्येच सिंटेलची स्शापना केली होती. मूळच्या पुण्यातील असलेल्या नेहा नारखेडे यांची संपत्ती 925 दशलक्ष डॉलर आहे आणि त्या या यादीमध्ये 29 व्या क्रमांकावर आहेत.
अपाचे काफ्का हे मेसेजिंग सॉफ्टवेअर त्यांनी विकसित केले आणि 2014 मध्ये त्यांनी कॉन्फ्लुएंटची स्थापना केली. रेश्मा शेट्टी यांची संपत्ती 750 दशलक्ष डॉलर आहे आणि त्या या यादीमध्ये 39 व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी इंजिनिअरिंगमधून पी.एचडी मिळवून गिंको ब्लोवर्क्सची स्थापना केली आहे.