पुणे -महापालिकेच्या 73 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकारी नगरसचिव पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. महापालिकेचे विद्यमान नगरसचिव शिवाजी दौंडकर येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार महापालिकेच्या राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश नुकतेच काढले आहेत.
महापालिकेचे तत्कालीन नगरसचिव सुनील पारखी ऑगस्ट 2020 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर, महापालिकेने या पदाचा पदभार कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याकडे देण्यात आला होता. तसेच पालिकेने या पदासाठी भरती प्रक्रियाही राबविली होती.
त्यात जवळपास 42 उमेदवार आले होते. तर 27 जणांची मुलाखतही झाली. मात्र, एकही उमेदवार पात्र ठरू न शक्याने गेल्या अडीच वर्षांपासून या पदाचा अतिरिक्त पदभार दौंडकर यांच्याकडेच होता. मात्र, आता दौंडकरही आठवड्याभरात सेवानिवृत्त होत असल्याने हे महत्वाचे पद रिक्त ठेवता येणार नसल्याने आयुक्तांनी या पदावर भोसले यांची नियुक्ती केली आहे. तर, या पदाचा कारभार पाहणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी असणार आहेत. 1 जूनपासून त्यांच्याकडे पदभार असणार आहे.