कर्जत-जामखेडसाठी आमदार रो”हित’ ठरत आहेत विकासाची नवी पहाट

संदेश हजारे
जवळा – ‘नको दूरचा, हवा घरचा’ अशी घोषणा काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘कर्जत-जामखेड’मध्ये ऐकायला मिळाली होती. निवडणुकीमध्ये मतदारसंघातील जनतेने ‘घरच्याला नाकारून, दुरच्याला निवडून दिले’ परंतु तोच दूरचा निकालानंतरच्या काहीच दिवसात घरच्यापेक्षा सरस कामगिरी करताना दिसत आहे.

माजी मंत्री प्रा.राम शिंदे हे राज्याचे जलसंधारण खात्याचे मंत्री, कुकडी प्रकल्पाचे प्रमुख आणि विशेष म्हणजे जामखेडचे भूमिपुत्र असूनही त्यांना मतदारसंघाचा मूलभूत असणारा ‘कुकडी’च्या पाण्याचा प्रश्‍न 5 वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात सोडवता आला नाही तोच प्रश्‍न नवनिर्वाचित आमदार रोहित पवार पहिल्या काही महिन्यांतच सोडवताना दिसत आहेत.

27 नोव्हेंबर 2019 रोजी कर्जत-जामखेडचा लोकप्रतिनिधी म्हणून शपथ घेण्याअगोदरपासूनच ‘कुकडी’ प्रकल्पाचा ते अतिशय सखोल अभ्यास करताना दिसून आले. त्यांनी कुकडीचा प्रश्‍न अपूर्ण का राहतो आहे, याच्या मुळाशी जाऊन प्रकल्पाबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांसोबत कायम बैठका घेणे, जुन्या कागदोपत्रांचा भलामोठा गठ्ठा घेऊन अभ्यास करणे, अडचणींची नोंद घेऊन त्या कशा सोडवायच्या यावर काम घेतले आणि अजूनही घेत आहेत.

कुकडी प्रकल्पाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 2003 पासून कधीही थेट प्रकल्पग्रस्त शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अधिकारी एकत्र आले नव्हते, ते आ. पवार यांनी एकत्र आणून भूसंपादनाचा मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांना तो मिळवून देऊन कुकडी प्रश्‍नांची सोडवणूक करण्याची सुरुवात केली. तसेच सीना धरणातून निघणाऱ्या पोटकालव्याच्या माध्यमातून कर्जत तालुक्‍यातील महत्वाच्या 21 गावांना त्याचा फायदा कसा होईल यासाठीही काम सुरु केले, त्याच बुजलेल्या चाऱ्या पुन्हा खणून त्यामध्ये पाणी सोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

 

कुकडी कालव्याच्या अस्तरीकरणाचे 25-30 वर्षांपासून रखडलेले काम पुन्हा हाती घेऊन ते सध्या 50 टक्‍क्‍यापेक्षा जास्त पूर्णत्वास नेले आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात कुकडी प्रकल्पाचा मुद्दा विधिमंडळात अतिशय मुद्देसूद आणि वेगळ्या पद्धतीने उपस्थित करून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. याच प्रश्‍नासंदर्भात लागलीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करत, प्रश्‍न मार्गी लावण्याचा शब्द घेतला आणि त्याचाच परिपाक म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून मतदारसंघातील जनतेचा सर्वात महत्वाचा असणारा कुकडीचा पाणीप्रश्‍न सुटण्यास सुरुवात झाली.

मागच्या आठ दिवसांपासून कर्जत तालुक्‍यातील अनेक कालव्यांमध्ये थेट पाणी पोहचले आहे. या रविवारी जवळ्यातील बंधाऱ्यात कुकडीचे पाणी दाखल झाले आणि सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. जवळ्यात पाणी आल्यानंतर ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि त्यांच्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जात आहेत.

गेल्या 25-30 वर्षांपासून कायम दुर्लक्षित आणि दुष्काळी राहिलेल्या कर्जत-जामखेडसाठी जे जे काही करावे लागेल, ते ते करण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहीन. मतदारसंघातील जनतेच्या प्रत्येक अडचणीची सोडवणूक करण्यासाठी मी हवं ते करीन, सदैव जनसेवा हे पवारसाहेबांचे तत्व घेऊन मी नवनवीन गोष्टी करणार आहे.

रोहित पवार आमदार, कर्जत-जामखेड 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here