पिंपरी – महापालिका 8 क्षेत्रीय कार्यालयांच्या भागामध्ये प्रत्येकी पाच लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात त्याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. लसीकरण केंद्रातंर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी 272 कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. दररोज आठशेपेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे शहरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांमध्ये करोना लसीकरण हा एक महत्त्वाचा उपाय आहे. महापालिकेकडून सध्या ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
महापालिकेने लसीकरणासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय (संत तुकारामनगर-पिंपरी), नवीन भोसरी रुग्णालय (भोसरी), नवीन जिजामाता रुग्णालय (पिंपरी), यमुनानगर रुग्णालय (निगडी), पिंपळे निलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना, तालेरा रुग्णालय (चिंचवड) आदी ठिकाणी व्यवस्था केली आहे. त्याशिवाय, ईएसआय रुग्णालयामध्ये देखील ही व्यवस्था केलेली आहे. तसेच, 13 खासगी रुग्णालयांमध्ये देखील लसीकरणाची सोय करण्यात आलेली आहे.
महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत 61 हजार 876 जणांना लसीकरण केले आहे. लसीकरणाची कार्यवाही आणि वेग वाढविण्यासाठी विविध नगरसेवकांकडून क्षेत्रीय कार्यालयनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. ही मागणी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातंर्गत येणाऱ्या भागामध्ये प्रत्येकी 5 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागातील सूत्रांनी दिली.