नगर – करोनाच्या प्रादुर्भावामुळे माथाडी कामगारांना परिस्थितीनुसार माथाडी मंडळाच्या प्रशासकीय किंवा राखीव निधी मधून पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी केली आहे. या बाबत माथाडी मंडळांना त्यांच्या स्तरावर निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यावेळी शरदचंद्र पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव, शशिकांत शिंदे, राजकुमार घायाळ, संतोष नांगरे, विकास मगदूम व हनुमंत बहिरट यांच्या उपस्थितीत पुणे येथे माथाडी कामगारांच्या प्रश्नांसाठी बैठक घेण्यात आली होती.
सुरक्षा रक्षक प्रमाणे माथाडी कामगारांना करोना संकटात अत्यावश्यक सुविधा मध्ये संरक्षण असावे यासाठीचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. माथाडी कामगारांना विमा कवच मिळावे अशा सूचना त्यामध्ये केल्या आहेत. अर्थ खात्याकडून तो लवकरच मंजूर होईल.
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा करोनामुळे मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी. एक लाख रुपये मदत देण्यात यावी असा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ने सरकारकडे पाठवला आहे.
लवकरच मयत कामगारांच्या कुटुंबाला ती मदत मिळेल.
तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या नेमणुका बाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला. या मुद्यांच्या अनुषंगाने कामगार विभागाने निर्णय घेतले आहेत. यापुढे माथाडी मंडळातील निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या माथाडी मंडळामध्ये नेमणूका करण्यात येऊ नये आदी विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आला आहे.