नारायणगाव -वारूळवाडी (ता. जुन्नर) परिसरातील नंबरवाडी येथील एका युवकासह कुटुंबातील पाच जणांचा करोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली, तसेच येणेरे येथील तीन जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.
वळणवाडीजवळील नंबरवाडी येथील 21 वर्षीय युवकाला 4 मे रोजी खोकला असल्याने त्याने वारूळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार घेतले होते. 6 मे रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांनी युवकाला फोन करून त्याच्या प्रकृतीची चौकशी केली, त्यावेळी युवकाने बरे वाटत असल्याचे सांगितले. 6 मे रोजी हा युवक 10-15 लोकांसमवेत नंबरवाडी येथील बंधाऱ्यात पोहण्यास गेला होता, 7 मे रोजी या युवकाला जुलाब आणि उलट्या झाल्यरा म्हणून शुक्रवारी (दि. 8) नारायणगावातील खोडद रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयामध्ये दोन सलाईन लाऊन त्याला 4 वाजता घरी सोडून दिले होते.
त्याच दिवशी सायंकाळी अस्वस्थ वाटल्याने त्याला दुसऱ्या खासगी डॉक्टरांकडे नेले. तेथे गेल्यावर डॉक्टरांनी तो मृत असल्याचे सांगितले. मृत्यू झालेल्या युवकांचे आई, वडील, आजी, आजोबा आणि भाऊ या पाच जणांना करोनाच्या तपासणीकरिता पुणे येथील वायसीएम हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि. 9) हलविण्यात आले होते. त्यांचा अहवाल सोमवारी (दि. 11) आला असून, या पाच जणांना करोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मात्र या पाच जणांसह मृत युवकाच्या सान्निध्यात आलेल्या 25 पैकी 20 जणांना होमक्वारंटाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर इतर पाचमधील खासगी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स यांना होमक्वारंटाइनमधून वगळण्यात आले आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. गुंजाळ
यांनी दिली.