सांगली -जिल्ह्यात साळशिंगे, भिकवाडी आणि कुपवाडमधील 5 जणांना करोनाची लागण झाली. सांगली जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढली असून जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथून साळशिंगे (ता. खानापूर) येथे आलेल्या आठ वर्षीय मुलाचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान शुक्रवारी मुंबईहून कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे आलेल्या 30 वर्षीय व्यक्तीचा चाचणी अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.
अहमदाबाद (गुजरात) येथून भिकवडी खुर्द (ता. कडेगाव) येथे आलेल्या अकरा वर्षीय मुलाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याच्या संपर्कात आलेल्या आणखी 3 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर कुपवाडमधील एकास करोनाची लागण झाली. शनिवारी जिल्ह्यात 5 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यापैकी आठ वर्षीय मुलगा साळशिंगे येथे आलेल्या बाधित महिलेचा पुतण्या आहे. या मुलाचे आई-वडील निगेटिव्ह आले आहेत. अहमदाबाद येथून दि. 4 मे रोजी 17 व्यक्ती आल्या. यामधील 6 व्यक्ती सातारा जिल्ह्यात उतरल्या.
तर उर्वरित सर्वजण सांगली जिल्ह्यात आले होते. या बसमधून आलेल्या साळशिंगे येथील महिलेचा चाचणी अहवाल दि. 10 मे रोजी करोना पॉझिटिव्ह आला होता. बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 15 जणांना संस्था क्वारंटाइन करण्यात आले होते. यातील 14 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 8 वर्षीय मुलाचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान या बसमधून प्रवास करून आलेल्या भिकवडी खुर्द येथील एका अकरा वर्षीय मुलाला देखील करोनाची बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य 3 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कुपवाडमधील लक्ष्मीनगर येथील एका 52 वर्षीय व्यक्तीस करोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, मुंबईहून चार दिवसांपूर्वी एक व्यक्ती कुंडलवाडी येथे आली आहे. गुरूवारी येलूर (ता. वाळवा) प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याची तपासणी केली. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्या व्यक्तीस गुरूवारी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी रात्री या व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संबंधित कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. अनुषंगिक उपाययोजना प्रशासनातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. साळुंखे यांनी दिली.