पुणे -पुण्यातील 500 अंगणवाड्यांत वीज कनेक्शनच नाही आणि मूलभूत पायाभूत सुविधाच उपलब्ध नसल्याचा मुद्दा आमदार सुनील टेंगरे यांनी विधिमंडळात उपस्थित केला. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर येत्या जानेवारीपर्यंत सर्व अंगणवाड्यांत वीजपुरवठा सुरू केला जाणार असल्याचे राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
विधीमंडळात आमदार सुनील टेंगरे यांनी पुण्यातील अंगणवाड्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. पुण्यातील 1181 अंगणवाड्यांत जुलै 2022 अखेर विजेची सुविधाच नाही. जिल्हा परिषदेमार्फत अंगणवाड्यांना अनुदान दिले जात असतानाही ग्रामीण भागातील 500 अंगणवाड्यांना वीजपुरवठाच नाही. तसेच 124 अंगणवाड्यांना 17 लाख विजेची थकबाकी असल्याने वीज बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यातील 117 अंगणवाड्यांना तांत्रिक अडचणीमुळे निधी वितरित झालेला नाही. अंगणवाड्यांना पायाभूत सुविधाच उपलब्ध नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याची कारणे काय आहेत, संबंधितांवर कारवाई होणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यासंदर्भात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राज्य सरकारकडून स्पष्टीकरण दिले. पुणे जिल्ह्यात सर्व अंगणवाड्यांना निधी दिला आहे. जानेवारीअखेर सर्व अंगणवाड्यांमध्ये वीजपुरवठा सुरू केला जाईल. यात अधिकाऱ्यांची कोणतीही चूक नाही.जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांना विजेबाबत ग्राम विकास खात्याकडून निधी उपलब्ध व्हायला हवी, अशी अपेक्षा आहे.
राज्यात 60 हजार अंगणवाड्यांत वीज नाही
राज्यात सुमारे 60 हजार अंगणवाड्यांना वीज नाही. त्यांच्यासाठी येत्या तीन महिन्यांत महिला व बालविकास विभागाकडून 20 कोटींची तरतूद करून सर्व अंगवाड्यांना वीज कनेक्शन व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. गेल्या तीन महिन्यांपासून अंगणवाडी दत्तक योजना सुरू केले आहे. त्यास प्रतिसाद 800 संस्था पुढे आल्या आहेत. त्यातून आदर्श अंगणवाडीची संख्या वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.