- काय आहे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा फिटनेस फंडा?
पिंपरी – अल्ट्रा मॅन आणि आयरन मॅन या जागतिक स्पर्धेत बाजी मारणारे कृष्ण प्रकाश हे भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील एकमेव अधिकारी आहेत. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी 5 सप्टेंबर रोजी पदभार स्वीकारला. तेव्हांपासून नव्या आयुक्तांच्या फिटनेसबाबत शहरात चर्चा सुरु आहे. आजही त्यांनी आपला फिटनेस कायम ठेवला आहे. कशा प्रकारे ते व्यायाम करतात, याबाबत त्यांनी दै. “प्रभात’ला दिलखुलासपणे सांगितले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा दिनक्रम पहाटे पाच वाजल्यापासून सुरू होतो. फिटनेसबाबत बोलताना ते म्हणाले, “”सकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत व्यायाम करतो. कधी एक तास तर कधी दोन तास धावण्याचा व्यायाम करतो. कोणतेही वजन न उचलता करता येणारे व्यायामही करतो. सूर्यनमस्कार आणि प्राणायामही करतो. कारण यामुळे उत्तम आरोग्य आणि मानसिक सुदृढताही राहते. आठवड्यातून दोनवेळा ध्यानही करतो. यामुळे आंतरिक शक्ती जागृत राहते. हेल्थ आणि फिटनेससाठी जेव्हा मी काही लक्ष्य निश्चित करतो तेव्हा आठवड्यातून एका साप्ताहिक सुट्टीच्या आदल्या रात्री मी धावणे आणि सायकलिंग करतो. कधी कधी सकाळी दहा वाजेपर्यंत मी माझा हा सराव सुरू ठेवतो. त्यामुळे माझी कार्यक्षमता वाढते.”
आयुक्त कृष्ण प्रकाश सांगतात, “”काही व्यायाम प्रकारात बेसल मेटाबॉलिक रेट बदलत नाहीत. तर काहीमध्ये हा बदल दिसून येतो. काही व्यायाम प्रकारात जलदगतीने केल्यावर तुमच्या ह्रदयाचे ठोके वाढतात. मात्र असे व्यायाम करताना ते शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक आहे. आपल्या ह्रदयाचे ठोके किती मर्यादेपर्यंत वाढले पाहिजेत. आपल्या धावण्याचा पल्ला कसा वाढविला पाहिजे, याचा शास्त्रीय सिद्धांत असतो. याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एखादा शिक्षक असावा असे नाही. त्यासाठी तुम्ही गुगलचाही वापर करू शकता.”
जिंकल्या जागतिक स्पर्धा
आयरन मॅन या स्पर्धेत 3.86 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावायचे असते. ही स्पर्धा 16 तासांत पूर्ण करायची असते. मात्र कृष्ण प्रकाश यांनी अवघ्या 14 तास 8 मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली. तर अल्ट्रा मॅन ही स्पर्धा तीन दिवसांची असते. त्यामध्ये पहिल्या दिवशी 12 तासात 10 किलोमीटर पोहणे आणि 146 किलोमीटर सायकलिंग करावी लागते. दुसऱ्या दिवशीही 12 तासात 275 किलोमीटर सायकलिंग करणे अनिवार्य असते. तिसऱ्या दिवशी ऐनवेळी खडतर परीक्षा घेतली जाते. मात्र यातही त्यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे अपघातानंतर डॉक्टरांनी कृष्ण प्रकाश यांना स्पर्धेत सहभागी होण्यास मनाई केली असतानाही त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन विजयश्री खेचून आणली.