- ग’ क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाईचा धडाका
पिंपरी – थुंकीबहाद्दर आणि मास्क न वापरणाऱ्यांविरूद्ध महापालिकेकडून दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईचा सर्वाधिक धडाका “ग’ क्षेत्रीय कार्यालयाने लावला असून आतापर्यंत 1 हजार 894 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून एकूण 6 लाख 54 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका आरोग्य विभागातर्फे 23 एप्रिलपासून मास्क न वापऱ्यांविरूद्ध प्रत्येकी 500 रुपये दंडाची कारवाई केली जात आहे. तसेच, रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून प्रति व्यक्ती 150 रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या 836 जणांविरूद्ध “ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करून त्यांच्याकडून 1 लाख 25 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर मास्क न वापरल्याबद्दल 1058 जणांकडून 5 लाख 29 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुली करण्यात “क’ क्षेत्रीय कार्यालय सर्वात मागे आहे. कार्यालयाकडून 416 नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 62 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात “ई’ क्षेत्रीय कार्यालय सर्वात पाठीमागे आहे. कार्यालयातर्फे केवळ 111 जणांविरूद्ध मास्क न वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 55 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला.
मास्क न वापरणाऱ्या 3 हजार 535 नागरिकांकडून महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत आत्तापर्यंत एकूण 17 लाख 67 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, रस्त्यावर थुंकणाऱ्या 5036 नागरिकांकडून 7 लाख 55 हजार 400 रुपयांचा दंड आकारला आहे.