पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – उजनी जलाशय हा तेथील वैविध्यपूर्ण पक्षीजीवनासाठी प्रसिद्ध आहे. बदके, करकोचे, पाणकोंबड्या, वेडर्स यासह ३०० हून अधिक प्रजाती इथे आढळतात. हा महत्त्वपूर्ण जलाशय, स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांना निवारा व मुक्कामासाठी उपयुक्त आहे.
वाइल्डलाइफ रिसर्च अँड कन्झर्वेशन सोसायटी (डब्ल्यूआरसीएस) आणि सोलापूर वनविभाग यांच्या विद्यमाने उजनी जलाशयात पहिला जलपक्षी गणना कार्यक्रम वार्षिक आशियाई वॉटरबर्ड सेन्सस (एडब्ल्यूसी) अंतर्गत दि. ३ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.
उजनी जलपक्षी गणना हा एक नागरिक-विज्ञान उपक्रम आहे. या जलपक्षी गणनेद्वारे जलपक्ष्यांची संख्या व त्यांचा विस्तार याबद्दल उपयुक्त माहिती मिळून जलपक्ष्यांच्या संवर्धनाला व त्यांच्या पाणथळ अधिवासाच्या संरक्षण व व्यवस्थापनाला मदत होणार असल्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
इच्छूक पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमी यांनी डब्ल्यूआरसीएसच्या संकेतस्थळावर जलपक्षी गणनेसाठी नोंदणी करावी, असे आवाहनही विभागीय वन अधिकारी (प्रसिद्धी व माहिती, वने) आशा भोंग यांनी केले आहे.