नवी दिल्ली – डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे देशात पहिला बळी गेला आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैन येथे कोविड-19 डेल्टा प्लस व्हेरिएंटने बाधित महिलेचा 23 मे रोजी मृत्यू झाला होता. काल त्यांना डेल्टा प्लस वेरिएंटची लागण झाल्याचे निश्चित झाले. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लस वेरिएंटचे आतापर्यंत एकूण 5 रुग्ण आढळून आले आहेत.
मध्य प्रदेश मध्ये आढळलेल्या 5 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 4 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. मृत्यू झालेल्या महिलेने कोविड-19 लस घेतली नव्हती. मे महिन्यात या महिलेचे नमूने घेण्यात आले होते. विशेष म्हणजे कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या महिलेच्या पतीला देखील करोनाची लागण झाली होती.
परिस्थितीशी सामना करण्यासाठी राज्य योजना आखत असल्याचे मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग यांनी एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना सांगितले. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांचे ट्रेसिंग करण्यात आले असून त्या व्यक्तींचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.