नवी दिल्ली – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे तज्ज्ञ कोविड-19 लसींचा डेल्टा प्लस व्हेरिएंटवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करत आहेत. लवकरच याचे निकाल हाती येतील, अशी माहिती आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी दिली आहे. तसेच डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये कठोर निर्बंध लागू करावेत आणि त्या परिसरातील लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, असेही त्यांनी सर्व राज्यातील सरकारांना सूचित केले आहे.
एका राष्ट्रीय इंग्रजी माध्यमाच्या रिपोर्टनुसार, लस घेणाऱ्यांकडून अँटीबॉडीजचे न्युट्रलायझेशन कसे होत आहे, याचा सखोल अभ्यास केला जात आहे, अशी माहिती आयसीएमआरच्या तज्ज्ञांनी दिली आहे.
करोनाचा पहिल्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज या कोविड-19 च्या सर्व व्हेरिएंट्सविरुद्ध तपासल्या जात आहेत, अशी माहिती न्युरोलॉजिस्ट डॉ. टी. जेकब जॉन यांनी दिली. याधीच्या व्हेरिएंट लक्षात घेऊन बनवलेल्या लसी अजूनही यशस्वी आहेत. त्यामुळे लसीमुळे निर्माण होणारी प्रतिकारक शक्ती ही डेल्टा प्लस व्हेरिएंटविरुद्ध सुद्धा कार्य करेल, असे ते म्हणाले.
सध्या डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या खूप कमी असून याचा प्रसार किती वेगाने होतो, हे अजून आपणास ज्ञात नाही. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा याचा अधिक वेगाने प्रसार होतो का, हे जाणणे गरजेचे आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात देशात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळले होते. परंतु, त्यावेळेस केलेला हलगर्जीपणा आता करुन चालणार नाही, हे सर्व कोविडचे व्हेरिएंट असल्यामुळे लस घेतलेल्यांना यापासून काही प्रमाणात सुरक्षा मिळेल, असे डॉ. जॉन यांनी सांगितले.