पुणे – देशभरात धूलिवंदन निमित्त मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांनी होळी रंगीबेरंबगी रंगांनी साजरी केल्याचे पाहायला मिळाले. कोरोना काळात सर्व सणांवर मर्यादा आल्या होत्या त्यामुळे प्रत्येकाला सणांचे महत्व जणू पटल्यासारखे वाटते. या वर्षीचा प्रत्येक सण मोठ्या आनंदात साजरा होताना दिसत आहे. अशात रंग खेळून झाल्यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात घडलेल्या या घटनेमध्ये तरुणाने थेट पिस्तूल काढल्याने एकच खळबळ उडाली.
धुळवडीला मार्केट यार्ड परिसरातील डॉ. आंबेडकरनगर येथे दोन गटांत हाणामारी झाल्यानंतर गोळीबार करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारात एक जण जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण तयार झाले होते.
डॉ. आंबेडकरनगर परिसरात मंगळवारी दुपारी दोन गटात वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेले. दोन्ही गटातील साथीदारांनी एकमेकांना मारहाण केली. यात पिस्तुलातून गोळीबार झाला. यातील एकाच्या हाताला गोळी घासून गेली आहे. मात्र रात्री उशीरा पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांनी सांगितले, की “जखमी व्यक्तीचा जबाब घेणे सुरू आहे. गोळीबार करणारा त्याचा मित्र आहे.’