जामिया मिलियामध्ये परवानगीशिवाय घुसल्याचे प्रकरण
नवी दिल्ली- नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठामध्ये आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील कारवाईसाठी परवानगी नसताना विद्यापिठाच्या आवारात घुसल्याबद्दल दिल्ली पोलिसांच्या विरोधात उद्यापासून “एफआयआर’ दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. विद्यापिठाच्या कुलगुरू नजमा अख्तर यांनी आज याबाबतची माहिती दिली.
“एफआयआर’ दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र त्याबाबतचा तपशील माध्यमांना दिला जाऊ शकणार नाही. या संदर्भात विद्यापिठाचे आक्षेप सरकारकडे पाठवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय विद्यापिठाच्या आवारामध्ये प्रवेश केला होता. पोलिसांच्या या कारवाई विरोधातील लढा यापुढे सुरूच राहिल, असे कुलगुरू नजमा अख्तर यांनी सांगितले.
विद्यापिठात 15 डिसेंबरला पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात “एफआयआर’ दाखल करण्यात यावी, या मागणीसाठी आज शेकडो विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. विद्यापिठाच्या परीक्षांच्या तारखा बदलण्यात याव्यात आणि विद्यापिठाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, आदी मागण्या विद्यार्थ्यांच्यवतीने करण्यात आल्या.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकाने जामिया मिलिया विद्यापिठाला यापूर्वीच भेट दिली आहे. त्यांना पोलिसांच्या अघोरी कारवाईचे पुरावे देण्यात आलेले आहेत. हे पथक उद्या (दि. 14) रोजी पुन्हा विद्यापिठात येणार आहे आणि साक्षीदर तसेच जखमी विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत, असेही कुलगुरूंनी सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला विद्यापिठाने घटनेनंतर तात्काळ पत्र पाठवून या प्रकरणी चौकशीची मागणीही केली असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.