अखेर शत्रुघ्न सिन्हा यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

भाजप म्हणजे सध्या केवळ वन मॅन शो

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाचे नेते व विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज कॉंग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. या प्रवेशानंतर भाजपवर टीका करताना ते म्हणाले की भाजप आज वन मॅन शो आणि टु मॅन आर्मी असा पक्ष बनला आहे त्यापक्षाकडून आता कोणतीही आशा उरली नसल्याने आपण त्या पक्षाला रामराम केला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

पक्षाच्या मुख्यालयात त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकार परिषदेलाही संबोधित केले. ते म्हणाले की भाजपचा आज स्थापना दिवस आहे त्याच दिवसाचा मुहुर्त पाहून मी पक्षातून बाहेर पडत आहे. भाजपने आडवाणी यांना दिलेल्या अवमानकारक वागणूकीचा उल्लेख करून ते म्हणाले की त्यांना पक्षाने सक्तीने मार्गदर्शक मंडळात पाठवले. त्या मंडळाची आजतगयात पक्षाने एकही बैठक घेतलेली नाही पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नसून त्याचे परिवर्तन आता एककल्ली राजकारणात झाले आहे. हा केवळ आता एका माणसाचाच पक्ष बनला आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली.

भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले की नोटबंदी म्हणजे जगातील एक सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. नोटबंदीमुळे हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, बॅंकांच्या रांगांमध्ये अनेकांचे प्राण गेले. अगदी पंतप्रधानांच्या मातोश्रींनाही बॅंकेच्या रांगेत उभे राहावे लागले इतकी भीषण परिस्थिती नोटबंदीमुळे निर्माण झालेली असताना सर्व काही सुरळीत असल्याचे मला सांगितले गेले असे ते म्हणाले.

लालूप्रसाद यादव यांच्या सुचनेवरूनच आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. शत्रुघ्न सिन्हा यांनी या आधीच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती त्यावेळीच त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला हिरवा झेंडा दाखवला गेल्याचे मानले गेले. आता त्यांना पटनासाहिब मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.