नवी दिल्ली/जयपूर – पायलट यांनी पुकारलेल्या बंडानंतर गेहलोत सरकारवर अल्पमताची नामुष्की ओढवण्याची चिन्ह निर्माण झाली होती. मात्र काँग्रेस नेतृत्वाला पायलट यांचे बंड शमवण्यात यश आल्याने मोठा राजस्थानातील राजकीय पेच प्रसंग टळला.
दरम्यान, पायलट यांनी उभारलेल्या बंडाला जवळपास महिना उलटल्यानंतर आज प्रथमच गेहलोत-पायलट यांची भेट झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उद्यापासून राजस्थान विधानपरिषदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात असून त्यापूर्वी आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी सचिन पायलट यांना देखील बोलवण्यात आले होते. मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या बिठकीला पायलट यांनी उपस्थिती लावल्याने पायलट-गेहलोत यांची भेट घडून आली आहे.
काँग्रेस आमदारांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या या बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हस्तांदोलन करत हसत मुखाने एकमेकांचे स्वागत केल्याचं छायाचित्रांमध्ये दिसत आहे.
#WATCH Jaipur: Congress leader Sachin Pilot meets CM Ashok Gehlot at his residence.
Congress Legislature Party meeting to take place here, ahead of the special session of the #Rajasthan Assembly tomorrow. pic.twitter.com/0pIZ1vr2dM
— ANI (@ANI) August 13, 2020
तत्पूर्वी, पायलट यांच्या बंडानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्यांचा उल्लेख ‘निकम्मा’ असा केला होता. बंड शमल्यानंतर पायलट यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या विरोधातील विखारी टीकेबाबत दुःख व्यक्त केले होते.
मुख्यमंत्री गेहलोत यांनी देखील आपल्या समर्थक आमदारांना ‘जे झालं ते विसरा आणि क्षमा करा’ असा सल्ला दिला होता.