- करोनाच्या नियमांचे पालन न करता कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी- पिंपरी- चिंचवड स्पर्धेच्या आयोजनात सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापौरांच्या मुलाविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवाहर मनोहर ढोरे (रा. सांगवी), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महादेव मारुती शिंदे (वय 54, रा. नेहरुनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. जवाहर ढोरे महापौर उषा ढोरे यांचा मुलगा असून भाजपाचेही पदाधिकारी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोरे यांनी मिस पिंपरी-चिंचवड सौन्दर्य स्पर्धेचे आयोजन केले होते. महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सोमवारी (दि. 22) सायंकाळी ही स्पर्धा पार पडली. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून स्पर्धेदरम्यान नियमांचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, 32 जणांवर मास्कसंबंधी कारवाई करण्यात आली. पुढील तपास चिंचवड पोलिस करीत आहेत.
दरम्यान स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी रॅम्प वॉक केले. त्यावेळी महापौर उषा ढोरे यांनी मास्कचा वापर न करता रॅम्प वॉक केला. चित्रपट अभिनेत्रीही या वेळी उपस्थित असल्याने प्रेक्षागृहात तोबा गर्दी झाली होती. अभिनेत्री आणि महापौर यांच्या भोवती मोठा घोळका झाला. घोळक्यातील अनेकांनी मास्कचा वापर केला नाही. तसेच एकत्र येऊन जमाव केल्याने या वेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. याबाबत माध्यमांमधून जोरदार टीका झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अभिनेत्रीवरही कारवाई होणार?
सौंदर्य स्पर्धेला उपस्थित असलेल्या अभिनेत्रीनेही मास्कचा वापर केला नाही. तसेच स्वत:भोवती घोळका करून घेत फिजिकल डिस्टन्सिंग पाळले नाही. त्यामुळे संबंधित अभिनेत्रीवरही पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. प्रेक्षागृहात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येकाला पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येणार आहे.