कराड – येथील सूर्यवंशी मळा येथे ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेस कराड नगरपालिकेचे अधिकारी व ठेकेदार जवाबदार असून संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणी निवेदन जान फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना दिले आहे.
निवेदनातील माहिती अशी मंगळवारी दुपार बारा वाजण्याच्या सुमारास विजय शिंदे हे काही कामानिमित्त सूर्यवंशीमळा येथे खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्याने जात होते. या रस्त्याने जात असताना ड्रेनेजसाठी खोदकाम करण्यात आलेल्या खड्ड्यात दुचाकीसह पडून त्यांचा दुर्देवी अंत झाला. सदर खोदकाम सुरू असताना याठिकाणी कोणतीही सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नव्हती. कोणतेही फलक, बंदीस्त कुंपण किंवा लाल पट्टीही लावण्यात आलेली नव्हती. ही काळजी ठेकेदाराने घेणे आवश्यक होते. तसेच त्याची पाहणी पालिकेने करणे गरजेचे होते. मात्र याबाबत कोणतीच काळजी घेतली न गेल्याने ही दुर्घटना घडली. त्यामुळे या घटनेस जबाबदार असणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच शिंदे कुटुंबियांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी नायकवडी यांनी पत्रकात केली आहे.