हॉटेल, पॉइंटस्, टेबल लॅंड बंद; पर्यटकांची तपासणी होणार
पाचगणी (प्रतिनिधी) – करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीत पालिका प्रशासन सतर्क झाले असून करोनाबाबत जनजागृती, प्रवेश कर नाक्यांवर आरोग्य पथकाची नियुक्ती, पॉइंटस् बंद ठेवण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. व्यावसायिकांनीही स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पाचगणीतील शाळा, हॉटेलमधील जलतरण तलाव, विविध पॉइंटस्, टेबल लॅंड बंद ठेवण्यात आले आहे. पॉइंटच्या प्रवेशाच्या ठिकाणी अडथळे बसवण्यात आले आहेत. या विषाणूचा थुंकीमधून प्रसार होऊ नये म्हणून शहरातील पानटपऱ्या बंद करण्याच्या सूचना दिल्या असून रस्त्यावर थुंकणाऱ्याला 200 रुपये दंड ठोठावण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी सांगितले.
पाचगणीतील दांडेघर व काचबवडी येथील प्रवेश कर नाक्यांवर बेल एअर रुग्णालयाच्या साह्याने तपासणी पथके तैनात करण्यात आली असून त्यांच्याकडून संशयित पर्यटकांची तपासणी होईल. बंगले भाड्याने देण्यावरही पालिकेने बंदी घातली असून तशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी लक्ष दिले असून औषधे फवारणी सुरू आहे. करोनाविषयी माहिती देणारी पत्रके घरोघरी वाटण्यात येत असून मुख्य ठिकाणी फ्लेक्सद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या.
टॅक्सीची चाके थांबली
पर्यटकांना मदतीचा हात देणाऱ्या स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेनेही टॅक्सी सेवा थांबवली आहे. मात्र, अत्यावश्यक वेळेसाठी तत्पर राहू, असे अध्यक्ष चंद्रकांत कासुर्डे यांनी सांगितले.
हॉटेल व्यवसाय बंद
काही हॉटेल व्यावसायिकांनी स्वतःहून व्यवसाय बंद ठेवले आहेत. महाबळेश्वर तालुका निवास न्याहरी संघटनेच्यावतीने तालुक्यातील निवास न्याहरी केंद्रे, लॉजिग व हॉटेल बंद ठेवण्यात आली आहेत.
पर्यटनस्थळे, बाजारपेठेत शुकशुकाट
पालिकेने पर्यटनस्थळे बंद केल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. बाजारपेठही ओस पडली आहे. पाचगणीचे प्रमुख आकर्षण असलेल्या टेबल लॅंडवरील व्यापारी व व्यावसायिकांनी स्टॉल, घोडे, घोडागाड्या, उपहारगृहे स्वयंस्फूर्तीने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.