स्त्री आरोग्य: गरोदर स्त्रियांचा आहार हवा पौष्टिक

गर्भ हा त्याच्या परिपूर्ण पोषणासाठी सर्वस्वी प्रत्येक मातेवर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक गर्भवतीने तिच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. प्रत्येक गर्भवतीचा आहार सात्विक व पौष्टिक हवा.आहारात प्रथिने, पिष्टमय पदार्थ, जीवनसत्त्वे, स्निग्ध पदार्थ आणि खनिजे यांचे प्रमाण पहिल्यापासूनच संतुलित हवे.

गर्भधारणेआधीपासूनची पूर्वतयारी – आहारतज्ज्ञाचा सल्ला

खरे तर गर्भधारणेआधीपासूनच भावी गर्भवती स्त्रीला तिचा गर्भ उत्कृष्ट निपजण्यासाठी दररोज आहारातून आवश्‍यक सत्त्वगुणयुक्‍त अन्नघटक मिळाले पाहिजेत. काही वेळा अन्नातील फॉलिक ऍसिड, झिंक, आयोडिन इत्यादी द्रव्यांच्या कमतरतेमुळे गर्भपात होऊ शकतो. बाळात एखादे व्यंग उदा. ऍननसिफाली म्हणजेच बाळाच्या मेंदूची वाढ व्यवस्थित न होणे, मतिमंदपणा यासारखी व्यंगं होऊ शकतात. तेव्हा आहाराबाबत गर्भवती होण्यापूर्वीपासूनच योग्य ती काळजी घ्यायला हवी. यासाठी गर्भधारणेआधीपासून डाएटेशियनचा सल्ला घेणे गरजेचे आहे. साधारण, एक महिना आधी फॉलिक ऍसिडची एक गोळी रोज डॉक्‍टरी सल्ल्याने घ्यावी.

गरोदरपणीचे पहिले तीन महिने

गरोदरपणीच्या पहिल्या तीन महिन्यांत गर्भवती स्त्रीचे वजन सहसा वाढत नाही. कधी कधी कडक डोहाळ्यांमुळे, म्हणजेच उलट्यांमुळे वजन कमी होण्याची शक्‍यता असते. या काळात तिला नेहमीपेक्षा 300 ते 350 उष्मांक अधिक लागतात. या पहिल्या तीन महिन्यांच्या काळात दर एक-दोन तासांनी थोडेथोडे काहीतरी खायला पाहिजे. द्रव पदार्थ हे जेवणानंतर लगेच कधीच लगेच घेऊ नयेत. दूध पिताना जर मळमळत असेल तर दुधाऐवजी दोन चमचे दूध पावडर किंवा चीज, पनीरचे दोन तुकडे घेतले तरी चालतात.

पहिल्या तीन महिन्यांतला आहार

गर्भवतीने झोपेतून उठल्या-उठल्या जवळच ठेवलेल्या बिस्किटाच्या पुड्यातून पाच मारी/आरारूट बिस्किटे प्रथम जाग येताच उठून न बसता, अगदी आडवे पडून जरी खाल्ली तरी चालतील. तोंड न धूता खाल्ले तरी चालेल, पण यासाठी आदल्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी दात घासून स्वच्छ करून मगच झोपावे. सकाळी 8.30 – 3 ब्राऊन ब्रेडचे टोस्ट किंवा जाड रव्याची ड्राय फ्रूट्‌स घातलेली खीर किंवा मूग डाळ व काजू घातलेला पौष्टिक उपमा किंवा फोडणीचे कांदेपोहे यापैकी न्याहारी रोज आलटून पालटून घ्यावी.

सकाळी 10.30 – 1 ग्लास दूध
सकाळी 11.30 – फळे डिश किंवा एक ग्लास फळांचा रस घ्यावा.
दुपारी 1.00 – 3 पोळ्या+भाजी+डाळ 1 वाटी वरण किंवा डाळ, भात, उसळ.
दुपारी 4 00 – राजगिरा लाडू/चिक्‍की/बेसनचे लाडू यापैकी आलटून पालटून एक घ्यावे.
संध्याकाळी 6.30 – एखादे फळ
रात्री 8.00 – जेवण, चपाती + डाळ + भाजी किंवा भाकरी/भात
रात्री 9.30 – एक कप दूध.

तुम्हाला मळमळते किंवा सतत उलट्या होतात म्हणून गरोदर स्त्रीने जेवायचे बंद कधीही करू नये. पहिलटकरणीने हे लक्षात ठेवावे की, तिच्या पोटातील बाळाचे सगळे अवयव चौथ्या महिन्यापर्यंत पूर्णपणे विकसित झालेले असतात. त्याचवेळी त्याला सगळी उपयुक्‍त रासायनिक द्रव्ये उदा. अमायनो ऍसिड्‌स, ट्रेस एलिमेन्टस्‌ इ. लागतात. उलट्या, मळमळणे याचा बाऊ घरच्या लोकांनी करू नये. उलट त्याला हसत तोंड द्यावे. बाळाची चाहूल अन्‌ त्यामुळे आलेली गर्भावस्था हा आजार नाही.

पौष्टिक आहार हवा

गर्भवतीने घाबरून न जाता योग्य आहार घेतला पाहिजे. नोकरी करत असणाऱ्या, धकाधकीची जीवनशैली असलेल्या महिलांनी आहाराचे वेळापत्रक जरूर करावे. शेवटी गर्भवती स्त्रीदेखील माणूसच आहे मग तीसुद्धा चुकणारच. एवढे काटेकोर नाही वागणार. 70-80 टक्‍केइतकेच आहाराचे वेळापत्रक पाळू शकेल तरी चालेल. पण गरोदर स्त्रीने एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी; ती अशी की तिने आपला कोणताही आहार घेताना आनंदी राहिले पाहिजे. “या पदार्थातून माझ्या बाळाची शक्‍ती, बुद्धी वाढणार आहे. असाच खाताना विचार केला पाहिजे. घाबरून न जाता आहारातील पथ्य-अपथ्याचा विचार करावा.

पाणी पिताना घ्यावयाची काळजी

10-12 ग्लास उकळलेले पाणीच शक्‍यतो प्यावे. अन्य पाणी प्यायले तरी काही तोटा नसतो पण जर त्यामुळे कावीळ किंवा टायफॉइड झाला तर गर्भावस्थेत त्रास होऊ शकतो. ह्यापेक्षा स्वतःसाठी तरी पाणी उकळून प्यायला हवे. पाण्याच्या भांड्यात सोने, चांदी व तांब्याचे प्रत्येकी एक नाणं किंवा इतर वस्तू टाकून ते पाणी प्यायल्यास धातूक्षाराचा लाभ आपल्याला मिळू शकतो. तसेच आपल्या आहारात सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स आली पाहिजेत.

कशात कोणते व्हिटॅमिन?

व्हिटॅमिन ए – लाल भोपळा, आंबा, गाजर, टोमॅटो, बीट यांपैकी दोन पदार्थ रोज खाणे.
व्हिटॅमिन बी – पालक, शेपू, कांद्याची पात, हिरव्या भाज्या, मेथी, आंबट चुका (आठवड्यातून तीन वेळा)
व्हिटॅमिन सी – लिंबू रोज अर्धा सरबत किंवा भाज्यांमधून, तसेच मोरावळा साखरेच्या पाकात करून फ्रिजमध्ये ठेवून रोज एक चमचा खायलाच पाहिजे.

व्हिटॅमिन डी – काही स्त्रियांच्या मुलांमध्ये पहिल्या महिन्यातच कमी कॅल्शियममुळे आकडीचे प्रमाण अधिक असते. रोज घरच्या गॅलरीत बसून हात, पाय व पाठीवर 10-15 मिनिटे ऊन घ्यावे कॅल्शिअमच्या उचित परिणामांसाठी डी जीवनसत्त्वाची गरज असते. कॅल्शियम शरीरात पचायला डी जीवनसत्त्व लागते. कारण त्यांना सूर्यप्रकाश व व्हिटॅमिन डी कमी मिळतो.

व्हिटॅमिन ई – व्हीटजर्म ग्रास म्हणजे गहू पेरून निघालेले अंकुर आठवड्यांतून 3 वेळा. लॅक्‍टोबॅसिलस – दही (1/2 वाटी) किंवा ताक फरमेंटेड किंवा आंबवलेले फूड – इडली, डोसा, ढोकळा आठवड्यातून 2 वेळा.

प्रथिने – सोयाबीनचे पीठ (1/4) गव्हाच्या पिठात + थोडे मेथीचे दाणे घालून तयार ठेवणे. राजगिरा + शेंगदाणे + गूळ + तीळ यांचे लाडू (साखर न घालता) तसेच सगळ्या डाळी- तूर, मूग, मसूर, मटकी, उडीद मोड आलेले धान्य- मूग, मटकी, चणा, चवळी, हरभरा, आठवड्यांतून तीन वेळा उसळ करणे.

शुभ्र गोष्टींपासून सावध

साखर – पांढरी साखर शक्‍यतो नकोच तर रासायनिक प्रक्रियाविरहित असा आयुर्वेदिक गूळच वापरावा. गूळ घालून केलेली लाल भोपळ्याची खीर जरूर आहारात असावी. मैदा – मैद्याचा ब्रेड व बिस्किटे यामध्ये कमी पोषणमूल्ये असतात. मैदाजन्य पदार्थ फक्‍त मेद किंवा चरबीयुक्‍त जाडी वाढवतात. म्हणूनच गरोदर स्त्रीने विशेष काळजी घेतली पाहिजे. या बेकरीजन्य पदार्थांचा गरोदर स्त्रीने कमी वापर करावा. वजन ह्यामुळे वाढते. त्याऐवजी गव्हाच्या पिठातले पदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावे. उदा. ब्राऊन ब्रेड, गव्हाच्या पिठातली तसेच नाचणी बिस्किटे किंवा प्रोटीन बिस्किटे आहारात असावीत. गरोदर स्त्रीने मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत हेच योग्य ठरेल.

मीठ – तळलेले पापड, बाजारपेठेत विक्रीस असलेली लोणची, सॅलेडमध्ये अधिक प्रमाणात मीठ असते. मिठाच्या अतिवापरामुळे गरोदर स्त्रीचे ब्लडप्रेशर वाढू शकते. तेव्हा शक्‍यतो पापड, लोणची यांचा आपल्या आहारात गरोदर स्त्रीने कमीच वापर करावा. नेहमीचे मीठ याचे प्रमाण अत्यंत अल्प हवे. आहारात अगर जेवताना थोडे काळेमीठ हे घ्यायला काहीच हरकत नाही.

तूप – मैदा + साखर + तूप ह्या तिन्ही पदार्थांच्या सेवनामुळे गरोदर स्त्रीचे खूप वजन वाढते. रोजच्या जेवणात वरण, भातावर किंवा पोळीवर असे एकंदर दिवसभरात 3- 4 छोटे चमचे गाईचे साजूक तूप घ्यायला काहीच हरकत नाही. साजूक तूप हे पित्तशामक असते व गर्भावस्थेत वाढलेली उष्णता ते सहजतेने कमी करते. गर्भावस्थेत एकूण वजन 11-12 किलोने सतत वाढत असते. त्यात पहिल्या तीन महिन्यांत एक ते दीड किलो, नंतरच्या 3 महिन्यांत 4 ते 5 किलो, शेवटच्या 3 महिन्यांत सहा ते साडेसहा किलो वजन वाढते.

सात्विक आहार कोर्स

आहार व्यवस्थित घेऊनसुद्धा काही गरोदर स्त्रिया अंगी का बरं लावून घेत नाहीत? याला कारणं, काही वेळा मागचा अनुभव असू शकते. अथवा एखाद्या स्त्रीची अंगकाठीच तशी असते. त्यामुळे काही गरोदर स्त्रियांमध्ये त्याचे परिणाम दिसत नाहीत. अशा स्थितीत अशा महिलांनी सात्विक आहार कोर्स चालू करावा.

आहारातले तामसी पदार्थ उदा. मांसाहार, अंडी, अतितिखट पदार्थ एकदम कमी करावेत. तामसी पदार्थ सेवन केल्यामुळे शरीरातील प्राणशक्‍ती किंवा जीवशक्‍ती कमी कमी होऊ लागते, असे होलिस्टिक संशोधकांचे स्पष्ट मत आहे. सात्विक आहार कोर्समध्ये आहाराची पौष्टिकताच नव्हे तर प्रत्येक जेवणाच्या वेळी द्रव्य, क्षेत्र, काल, भाव, हे स्वयंपाक करतानाच उच्च पाहिजे व बाळापर्यंत हे पोषण कसे पोहोचवायचे हे योग्य वैद्याकडून समजावून घेतले पाहिजे.

आरोग्याची काळजी

स्त्रीला लाभलेले गरोदर राहण्यास योग्य असे शरीर ही एक दैवी देणगीच आहे; परंतु हे पूर्वकर्म तसेच निसर्गशक्‍तीचे दान असल्यामुळे ह्या शरीरासाठी आपल्याला काहीच किंमत द्यावी न लागल्याने आपण त्याला गृहीत धरत असतो. पण गरोदरपणात स्त्रीची जबाबदारी वाढते तिला ह्याच आपल्या शरीराच्या माध्यमातून आणखी एक नवे परिपूर्ण शरीर निर्माण करायचे काम असते.

निसर्गाशी, नैसर्गिक नियमांशी एकरूपता साधता आली तर हे कार्य सहजतेने व परिपूर्णतेने घडून येते. नेहमीपेक्षा आणखी वेगळे काय करायचे यावर डॉक्‍टर्स, नातेवाईक शक्‍यतो जास्त भर देतात; परंतु नेहमी ती स्त्री जे करत असते किंवा जी दिनचर्या तिची असते त्यात काय बदल करायला हवेत? जर कोणत्या चुका असतील तर त्या कशा सुधारायला हव्यात? ह्याकडे आपण लक्ष द्यायला हवे. गरोदरपणात मुख्यत्वे गरोदर स्त्रीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्‍यकता असते ते प्रथम आपण पाहिले पाहिजे.

नाकाचे आरोग्य

नाकपुडीतल्या सुरुवातीच्या अर्धा इंच भागाचे आरोग्य चांगले असेल तर शिंका येणे, सर्दी होणे हे घडत नाही. नाकाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोज रात्री झोपण्याआधी नस्य करावे. करंगळीवर थेंबभर तूप किंवा तेल घेऊन करंगळीवर पसरून ही करंगळी नाकपुडीच्या आत गोल फिरवावी. दिवसातून, एक-दोनदा तुळशी पावडर तपकिरी सारखी ओढावी. रोज सकाळी जलनेती करावी. ती येत नसेल तर नुसते एका हाताच्या खोलगट भागात पाणी घेऊन त्यात नाकपुडी बुचकळावी.

बाळ गुटगुटीत होण्यासाठी

ज्येष्ठमध, अनंतमूळ (सारिवा) व शतावरी ह्यांचे नियमित सेवन गरोदरपणात करावे. प्रत्येकी अर्धा चमचा एका वाटीत घेऊन त्यातच चमचाभर साजूक तूप व अर्धा चमचा हळद घालून पाववाटी दुधात पेस्ट करून ती नाश्‍त्यानंतर गिळून टाकावी व त्यावर गरम दूध प्यावे. केशरची एखादी काडी, चंदन लाकडाने सहाणेवर उगाळून हे गंध 1 चमचाभर ह्याच दुधात मिसळून घ्यावे. याने उष्णतेचे विकार होत नाहीत व बाळ गुटगुटीत होते व बाळाचा रंग उजळ होतो.

– डॉ. मेधा क्षीरसागर

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.