पैठण – बिबट्याच्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना पैठण तालुक्यातील आपोगावच्या शिवरात सोमवारी रात्री घडली. अशोक सकाहरी औट (वय 52) आणि कृष्णा अशोक औट (वय 31) अशी मृतांची नावे आहेत. पैठणचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी ही माहिती दिली.
सोमवारी रात्री मृत औट पिता-पुत्र शेतात गेले होते. ते माघारी न परतल्यामुळे कुटुंबीय शेतात शोधण्यासाठी गेले होते. त्यावेळी दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी या घटनेची माहिती पैठण पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. दोन्ही विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
औट कुटुंबीयांना वन विभागाने तातडीने मदत द्यावी, बिबट्याला तातडीने पकडावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी मृतांवरील अंत्यसंस्कार दीड तास रोखला. तहसीलदार चंद्रकांत शेळके, वन विभागाचे अधिकारी जाधव, पोलीस अधिकारी घटनास्थळी होते. दरम्यान वन विभागाने एक- एक लाखाचे तर पैठण तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्येकी 50 हजारांच्या मदतीचा धनादेश दिला.