शासनाच्या मदतीची शेतकऱ्यांना आस

अतिवृष्टीमुळे 181 हेक्‍टर क्षेत्र बाधित ः इंदापूर तालुक्‍यात 40 हजार शेतकऱ्यांचे नुकसान

नीलकंठ मोहिते
रेडा (पुणे) – अतिवृष्टी व पावसामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये 40 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे 181 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या अपेक्षेवर अवलंबून राहिले आहेत. ही मदत दिवाळी अगोदर मिळेल. यासाठी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मोठी आस लागून राहिली आहे.

शासनाच्या नियमानुसार अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे ते 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले असेल. तरच त्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळेल असा दंडक आहे. इंदापूर तालुक्‍यातील कृषी कार्यालयाने याच पद्धतीचा अहवाल वरीष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. यामध्ये जवळपास 40 हजार शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज असल्याचे चित्र आहे. तालुक्‍यातील जवळपास 140 गावांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सातत्याने कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत, एकही शेतकरी पंचनामा वाचून वंचित राहणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे सध्या जरी शासनाकडे याद्या पोच झाल्या असल्या, तरी देखील काही गावांचे पंचनामे अद्याप सुरू आहेत.

तालुक्‍यांमध्ये अत्यंत भयानक अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये ज्वारी, बाजरी, मूग, सोयाबीन, तूर, कांदा, भाजीपाला, भुईमूग, सूर्यफूल, कापूस व सर्व प्रकारच्या फळबागा अतिवृष्टीमुळे नेस्तनाबूत झाल्या आहेत. मात्र शासनाच्या नियमानुसार तीस टक्क्‌यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. हा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
– भाऊसाहेब रुपनवर, तालुका कृषी अधिकारी इंदापूर

शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची आस
राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे तालुक्‍यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ रकमा द्या अशी मागणी शासनाकडे वारंवार करीत आहेत. तर प्रत्येक शेतकऱ्याला शासनाकडून मदत मिळावी यासाठी अधिकाऱ्यांना मेहनत घेण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. असे असले तरीदेखील या शेतकऱ्यांचे शासनाच्या मदतीची आस लागली आहे.

दिवाळी अगोदर मदतीसाठी जोरदार हालचाली
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळण्यासाठी इंदापूर तालुका कृषी कार्यालयात रात्रंदिवस धावपळीने याद्या बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. दिवाळी अगोदरच शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे, अशी खात्रीशीर माहिती सुत्रांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.