लुधियाना -पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी संयुक्त समाज मोर्चा या शेतकरी संघटनांच्या आघाडीने बुधवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्या यादीत 10 उमेदवारांचा समावेश आहे.
संयुक्त समाज मोर्चाच्या पहिल्या यादीत त्या आघाडीचे प्रमुख बलबीरसिंग राजेवाल यांचेही नाव आहे. थेट शेतकरी संघटनाच रिंगणात उतरल्याने पंजाबमधील निवडणूक आणखी चुरशीची बनण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन केले. त्या आंदोलनात सहभागी झालेल्या विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन संयुक्त समाज मोर्चा या राजकीय आघाडीची स्थापना केली.
आता ती आघाडी पंजाबची निवडणूक लढवण्यास सरसावली आहे. दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनामुळे पंजाबचे वातावरण ढवळून निघाले. त्यामुळे शेतकरी आघाडीने राजकीय मैदानात दंड थोपटल्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्या आघाडीला मतदार कसा प्रतिसाद देणार आणि पंजाबमधील समीकरणे बदलणार का हे निकालातून स्पष्ट होईल. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होईल. उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या इतर चार राज्यांसमवेत पंजाबमध्ये 10 मार्चला मतमोजणी होईल.