Farmer Protest । पंजाबमधील एका 22 वर्षीय शेतकऱ्याचा बुधवारी संगरूर जिल्ह्यातील खनौरी सीमेवर डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. हरियाणा सुरक्षा दलाच्या जवानांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. शुभकरन सिंह यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने मोठी घोषणा केली.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकरी आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या शेतकरी शुभकरन यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय मृत शुभकरनच्या लहान बहिणीलाही सरकारी नोकरी देण्याचीही घोषणा मान सरकारकडून करण्यात आलीय.
एक कोटी रुपयांची मदत, बहिणींना सरकारी नोकरी Farmer Protest ।
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘पंजाब सरकार मृत शेतकरी शुभकरनच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे. शुभकरणच्या लहान बहिणीला पंजाब सरकार नोकरी देणार आहे. दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.” असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिलंय.
हेही वाचा
Farmers Protest on Shubkaran Singh । ‘यशस्वी शेतकरी होण्याचा प्रवास थांबला’ ‘त्या’ तरुण शेतकऱ्याचा मृत्यूमुळे आंदोलन चिघळणार?
दरम्यान, पंजाबच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की खनौरी आणि शंभू सीमेवर एकूण 26 लोक जखमी झाले आहेत, ज्यांना हरियाणा पोलिसांनी मोर्चा रोखण्यासाठी बॅरिकेड केले होते. भटिंडा जिल्ह्यातील बलोह गावातील शुभकरन सिंह या युवकाचा शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला. पटियाला येथील राजिंद्र हॉस्पिटलमध्ये त्यांना “मृत” घोषित करण्यात आले. शुभकरनच्या डोक्याला दुखापत कशामुळे झाली हे स्पष्ट झालेले नाही असे म्हटले आहे.
10 दिवसांपासून निदर्शने सुरू Farmer Protest ।
एमएसपी आणि इतर मागण्यांसाठी शेतकरी पंजाब-हरियाणा सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. दरम्यान, हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दावा केला आहे की, खनौरी सीमेवर बुधवारी पोलिसांशी झालेल्या चकमकीत एका 22 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला, त्यानंतर शेतकरी सतत संतापले आहेत.