शेतकऱ्यांचा फलटण तहसील कार्यालयावर मोर्चा

रस्ता रुंदीकरणासाठी घेतलेल्या जमिनींचा मोबदला देण्याची मागणी

कोळकी  – श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी महामार्ग क्रमांक 965 राखीव क्षेत्र, असा शेरा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नोंदवला असला तरी शेतकऱ्यांना त्याची भरपाई देण्यात आलेली नाही. याच्या निषेधार्थ बाधित शेतकऱ्यांनी आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला.

यापूर्वी दोन तीन वेळा प्रांताधिकारी, तहसीलदार व प्रकल्प संचालकांना निवेदने देऊनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. बाळूपाटलाचीवाडी ते राजुरी या 60 किमी अंतरातील बाधित क्षेत्रासाठी भरपाई मिळावी यासाठी फलटण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आज सकाळी फलटण येथे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन शेतकऱ्यांनी पोलीस, प्रांताधिकारी, तहसीलदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आधीच दिले होते. निवेदनातील इशाऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचे योजले होते; परंतु महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी शेतकऱ्यांना भेटून भरपाई देण्याची प्रक्रिया येत्या 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण करू, असे पत्र दिले.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तूर्त स्थगित केले आहे. 10 डिसेंबरला भरपाई न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
सुहास चिटणीस, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार हनुमंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून केली.

Leave A Reply

Your email address will not be published.