शेतमालास भाव नसल्याने शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पारनेर  -पारनेर तालुक्‍यातील करंदी येथे एका तरुण शेतकऱ्याने शेतमालाला नसलेला बाजार भाव व कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तसे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने नमूद केले आहे. 

करंदी येथील अशोक रभाजी मोहिते (वय 38) हे मंगळवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता घराच्या बाहेर पडला. तेव्हापासून ते घरी परतलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. बुधवारी (दि. 16) दुपारी दोनच्या सुमारास करंदी व हत्तलखिंडी परिसरातील वनविभागाच्या हद्दीमध्ये झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

या तरुण शेतकऱ्याने शेतीला नियमित बाजार भाव नसल्याने व त्यातून कर्जबाजारी झाल्यामुळे नैराश्‍यातून ही आत्महत्या केल्याचे लिहून ठेवलेल्या चिठ्ठत नमुद केले आहे. चिठ्ठीत म्हटले आहे की, मी शेतकरी असून, शेतीमालास व दुधाला भाव नसल्याने कर्जबाजारी झालो आहे. जवळ भांडवल नसल्यामुळे धंद्यात अडचणी येत होत्या. गरिबीमुळे जीवनात निराशा आली होती.

गेल्या सहा महिन्यांपासून शेतीतून उत्पन्न न मिळाल्याने या शेतकऱ्याने बॅंकेतून कर्ज काढले होते. मात्र हे कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न त्याच्यासमोर होता. आधी कोरोनामुळे, सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतामध्ये काही हाताला लागले नाही. त्यामुळे निराश झालेल्या मोहिते यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आहेत.

अनेक दिवसांपासून शेतमालाला बाजार नसल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडे असणारे भांडवल शेतीत गुंतवले. मात्र त्यातून काही उत्पन्न न मिळाल्याने त्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.