पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या फोटोचा वापर करून फेक व्हॉट्सअप प्रोफाइल बनवून दोन नगरसेवक आणि काही नागरिकांकडे आर्थिक मदतीची मागणी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत महापालिकेच्या वतीने मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी पोलीस खात्याशी संबंधित सायबर सेलकडे ऑनलाइन तक्रार केली आहे. फेक प्रोफाइल आयडीद्वारे कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास नागरिकांनी त्याबाबत पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच, कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, माझ्या फोटोचा व्हॉट्सऍप प्रोफाइल म्हणून वापर करून ऑनलाइन चॅटींगद्वारे नगरसेवक तसेच नागरिकांना फसविण्याचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला अनुसरून मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी पोमण यांनी पोलीस खात्याशी संबंधित सायबर सेलकडे फेक आयडी आणि प्रोफाइलचा गैरवापर याबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविली आहे.
या तक्रारीनुसार, अज्ञात व्यक्तीमार्फत दोन मोबाइल क्रमांकाचा वापर करून व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून काही नगरसेवक आणि नागरिकांशी चॅटींगद्वारे आर्थिक मदतीची विचारणा केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि शहरवासियांनी अशा प्रकारे होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी 7524891151 आणि 7977510080 या क्रमांकावरून अथवा अन्य क्रमांकावरून फेक प्रोफाइल आयडीद्वारे कोणत्याही स्वरुपाची मागणी केल्यास त्याबाबत पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नये. अशा प्रकारे कोणतीही मागणी करण्यात येत नसल्याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे पिंपरी-चिंचवड महपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्तांचा फेक प्रोफाइल आयडी बनवून व्हॉट्सअप कॉल आणि मेसेजद्वारे नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची ऑनलाइन तक्रार महापालिकेचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी सायबर सेलकडे दिलेली आहे. दोन नगरसेवक आणि काही नागरिकांना आयुक्त असल्याचे भासवून अशा प्रकारे ऑनलाइन मदतीची मागणी करणारे व्हॉट्सअप कॉल व मेसेज गेलेले आहेत. संबंधित प्रकाराचा तपास सुरू आहे.
– डॉ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम.