नवी दिल्ली – काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने पीएमओ अधिकारी असल्याचे भासवून एका महिलेशी लग्न केले. आपल्या वेगवेगळ्या ओळखीचा बहाणा करून एकूण सहा महिलांशी लग्न केल्याचा आरोप या नराधमावर आहे. कधी हा आरोपी स्वत:ला न्यूरोसर्जन, कधी आर्मी डॉक्टर तर कधी एनआयएचा वरिष्ठ अधिकारी म्हणवून घेतो. मात्र, ही व्यक्ती ना अधिकारी आहे ना डॉक्टर, ना तो व्यावसायिक आहे.
ओळख लपवून महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी काश्मीरमधील कुपवाडा येथील एका व्यक्तीला ओडिशात अटक करण्यात आली आहे. ओडिशा पोलीस स्पेशल टास्क फोर्सने काल महिलांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ३७ वर्षीय सय्यद इशान बुखारी उर्फ इशान बुखारी उर्फ डॉक्टर इशान बुखारी याला ओडिशातील जयपूर जिल्ह्यातील नेउलपूर गावातून अटक केली. अनेक बनावट ओळखी असलेल्या या व्यक्तीचे पाकिस्तानमधील अनेक लोकांशी आणि केरळमधील काही संशयित लोकांशी संबंध होते. मात्र, त्याचा पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्सशी संबंध अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.
कॉर्नेल युनिव्हर्सिटी,सामेरिकेमधील टॉप आयव्ही लीग कॉलेजचे वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र असल्याचे दाखवण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रे तयार केली. डॉक्टर म्हणून आपली ओळख पटवण्यासाठी, त्याने कॅनेडियन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्रमाणपत्रही मिळवले. तामिळनाडूतील एका महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी प्रमाणपत्रही मिळवले.
लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन ओळख निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पदवी, शपथपत्र, बाँड, एटीएम कार्ड, कोरे धनादेश, आधार कार्ड आणि व्हिजिटिंग कार्डे ठेवण्याची बुखारीची योजना असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. एसटीएफ पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १०० हून अधिक कागदपत्रे आणि अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.
बुखारीने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, काश्मीर इत्यादीसह देशाच्या विविध भागांतील किमान सहा महिलांशी लग्न केले आणि अनेक महिलांशी प्रेमसंबंध ठेवले. तो अनेक वेबसाइट्स आणि अॅप्सवर सक्रिय होता आणि लोकांची फसवणूक करण्यासाठी त्याच्या ओळखीचा वापर करत होता.