सुरत – गुजरातच्या सूरतमध्ये पोलिसांनी 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांनी भरलेले बॉक्स जप्त केले आहेत. अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेत बनावट नोटांचा मोठा साठा असल्याची माहिती सुरत ग्रामीण पोलिसांच्या कामरेज पोलीस ठाण्याला मिळाली होती. यावेळी कामरेज पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून बनावट नोटा घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला पकडले.
यात सुरत पोलिसांनी रुग्णावाहिकेमधून 25 कोटी रुपयांत्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या सर्व नोटांवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ऐवजी रिव्हर्स बॅंक ऑफ इंडिया असे लिहिले होते. या प्रकरणाचा तपास पोलिसाकडून सुरु आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमधील लिंबायत भागात एका जाहीर सभेला संबोधित केले. याचवेळी संध्याकाळी सुरत जिल्ह्यातील कामरेज भागात तपासादरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पकडल्या आहेत.
मूळचा जामनगर येथील हितेश पुरुषोत्तम कोटडिया या रुग्णवाहिकेचा चालक होता. यावेळी रुग्णवाहिकेचा मागील दरवाजा उघडून तपासणी केली असता आतमध्ये 6 बॉक्स आढळून आले, त्यात दोन हजार रुपयांचे 1290 बंडल आढळून आले, ही रक्कम 25 कोटी 80 लाख इतकी आहे. याप्रकरणी आता रुग्णवाहिका चालकाची अधिक चौकशी सुरू आहे.