नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी मंगळवारी बनावट कॅन्सरची औषधे बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखेचे विशेष आयुक्त आरएस यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील दोन अभियंते, एक डॉक्टर आणि एमबीएला अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की,’हरियाणातील सोनीपतमधील एक कारखाना आणि गाझियाबादमधील एका गोदामाचा भंडाफोड करण्यात आला आहे. यादरम्यान पोलिसांनी आठ कोटी रुपयांची बनावट औषधेही जप्त केली आहेत. गेल्या २-३ वर्षांपासून या रॅकेटमध्ये सहभागी असलेले तीन जण फरार आहेत.’
या टोळीचे मोठे गोदाम गाझियाबादच्या ट्रॉनिका सिटीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. येथे कॅन्सरच्या औषधांची पॅकिंग करण्यात आली होती. यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की डॉ. पवित्रा प्रधान आणि शुभम मन्ना नोएडाच्या सेक्टर 43 मध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होते आणि तेथून त्यांचा व्यवसाय चालवत होते. यासोबतच हे आरोपी देशभरात औषधे पोहोचवण्यासाठी ‘व्ही फास्ट’ कुरिअर बुक करायचे.
या टोळीतील सदस्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने पंकज सिंग बोहरा नावाच्या व्यक्तीला पकडले, ज्याने गाझियाबादमध्ये असलेल्या गोदामाची माहिती दिली. यानंतर दुसऱ्या पथकाने डॉ. पवित्रा प्रधान, शुभम मन्ना आणि अंकित शर्मा यांच्या नोएडाच्या ४३ क्रमांकाच्या फ्लॅटची झडती घेतली आणि त्यांना अटक केली. येथून मोठ्या प्रमाणात औषधांचा साठाही जप्त करण्यात आला आहे.