पुणे -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप हे एप्रिल अखेर सेवानिवृत्त होत आहेत. दरम्यान, ते आता तीन आठवडे वैद्यकीय रजेवर जाणार असल्याने परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाच्या डोक्यावर देणार? असा प्रश्न निर्माण होऊ झाला आहे.
“टीईटी’च्या परीक्षेच्या निकालात फेरफार करून अपात्र उमेदवारांना पात्र करण्यात आले. यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. याप्रकरणी परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह जी.ए.सॉफ्टेवअर कंपनीचे संचालक व इतर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आले असून दोषारोप पत्रही सादर झाले आहे. “टीईटी’ घोटाळ्यामुळे शिक्षण विभागालाच भ्रष्टचाराचा कलंक लागला आहे.
परीक्षा परिषदेला सक्षम अधिकार कधी मिळाले नसल्याने या गडबडी होत आहेत. परीक्षा परिषदेचे आयुक्तपद रिक्त असून त्याचा अतिरिक्त कार्यभार उपायुक्त शैलदा दराडे यांच्याकडेच देण्यात आला आहे. मात्र, त्यांना हा अतिरिक्त कार्यभार पेलवतो की नाही, याबाबत साशंकता वर्तविण्यात येत आहे.
…कारभाराबाबत अशी आहे स्थिती
अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक दिनकर पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आदी संचालक कार्यरत आहेत. शिक्षण आयुक्तालयात सहसंचालक पदी डॉ.अशोक भोसले हे कार्यरत आहेत. यातील टेमकर हे मे अखेर व दिनकर पाटील हे ऑगस्टमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या दोघांकडे परीक्षा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार जाणार नाही, हे निश्चित आहे.