पुणे – अकरावी प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या नियमित फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि.4) सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. त्याचबरोबर दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीनुसार प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. पहिल्या नियमित फेरीत मिळालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्यासाठी 3 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती.
परंतु, करोनामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितसाठी अडचण येत असल्याचे निदर्शनास आले. दिलेल्या मुदतीत निश्चित झालेल्या प्रवेशांची संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक दिवस मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक
* रिक्त जागांची यादी प्रसिद्ध : 4 सप्टेंबरला रात्री 10.
* पसंतीक्रम नोंदविण्यासाठी मुदत : 5 ते 7 सप्टेंबर
* दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध : 10 सप्टेंबरला 10 वाजता
* प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत : 10 ते 12 सप्टेंबर
* प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळार उपलब्ध : 12 सप्टेंबर रात्री 8
* तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील : 12 सप्टेंबर रात्री 10