चंडिगढ – हरियाणातील प्रभावी आमदार कुलदीप बिष्णोई यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. कॉंग्रेसमधून हकालपट्टी झालेले बिष्णोई 4 ऑगस्टला भाजपचे सदस्यत्व स्वीकारणार आहेत. त्याआधी ते आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे समजते.
तब्बल चारवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार बनलेले 53 वर्षीय बिष्णोई हे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे पुत्र आहेत. कॉंग्रेसने चालू वर्षीच्या प्रारंभी हरियाणा शाखेत फेरबदल केले. त्यावेळी प्रदेशाध्यक्षपद मिळण्याची बिष्णोई यांना आशा होती. मात्र, त्या पदावर वर्णी न लागल्याने बिष्णोई नाराज होते. त्या नाराजीपोटी त्यांनी जूनमधील राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग केले. त्यानंतर कॉंग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
तेव्हापासून बिष्णोई यांची भाजप नेत्यांबरोबरची जवळीक वाढल्याचे वारंवार दिसून आले. अलिकडेच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या. आता त्यांचा पक्षबदल निश्चित झाला आहे. त्यांचा प्रवेश हरियाणात सत्तेवर असणाऱ्या भाजपचे बळ वाढवणारा ठरणार आहे.