मुंबई – अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकार जास्त कर्ज घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सरकारची तूट वाढणार आहे. या कारणामुळे रुपयाच्या मूल्यावर मंगळवारी दबाव आला आणि रुपयाचा भाव कमी झाला.
मंगळवारी रुपया 17 पैशांनी कमी होऊन 74.82 रुपये प्रति डॉलर झाला. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, यावर्षी सरकार आपला खर्च भागविण्यासाठी 11.6 लाख कोटी रुपयाचे कर्ज घेणार आहे. 2020-21 व्या वर्षातील तूट ठरविल्या पेक्षा जास्त होऊन 6.9 टक्के इतकी झाली आहे.
त्याचबरोबर आगामी वर्षातील म्हणजे 2022-23 या वर्षातील तूट 6.4 टक्के इतकी ठरविण्यात आली आहे. त्यामुळे डॉलरची मोठ्या प्रमाणात खरेदी होऊन रुपयाचा भाव कमी झाल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
जागतिक बाजारात क्रूडचे दर सध्या 90 डॉलरच्या जवळपास आहेत. त्याचाही रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. रुपयाच्या दृष्टीकाणातून आणखी एक नकारात्मक बाब म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून गुंतवणूक काढून घेत असल्यामुळे भारतातील डॉलरच्या साठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.