पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वैद्यकीय विभागाच्या 128 पदांकरिता शनिवारी परीक्षा झाली. ही परीक्षा वैद्यकीय क्षेत्राची असल्याने त्या क्षेत्रातील प्रश्न विचारणे आवश्यक होते. मात्र या परीक्षेमध्ये थेट राजकारणांशी निगडीत प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. तर ही परीक्षा डॉक्टर, परिचारिका यांच्यासाठी होती की, प्रशासकीय अधिकारी भरण्यासाठी होती असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या नोकर भरतीसाठी टीसीएस या संस्थेला परीक्षा प्रक्रिया राबवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार या संस्थेने 13 शहरांमध्ये 47 केंद्रांवर ही परीक्षा घेतली. या परीक्षेला अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 70 टक्के म्हणजेच सुमारे 13 हजार 500 उमेदवार उपस्थित होते. ही परीक्षा वैद्यकीय विभागातील पदांसाठी घेण्यात आली. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, सांख्यिकी सहायक, लॅब टेक्निशयन, एक्स रे टेक्निशयन, फार्मासिस्ट, एएनएम या पदांचा समावेश होता. या पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत प्रश्न विचारणे आवश्यक होते. मात्र प्रश्नपत्रिकेमध्ये राजकीय प्रश्नांचा भरणा होता असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
आगामी महापालिका निवडणूक कशाशिवाय होणार आहे. याबाबतचा देखील प्रश्न होता. मात्र जे उमेदवार वैद्यकीय क्षेत्राचा अभ्यास करून एमबीबीएस किंवा फार्मासिस्ट झाले आहेत त्यांना या प्रश्नाचे उत्तर माहीत असणे अवघड आहे. त्यामुळे या परीक्षा प्रक्रियेवर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.
दोन दिवसांत संकेतस्थळावर निकाल
शनिवारी राज्यातील 13 शहरांमध्ये ही परीक्षा झाली आहे. त्यानंतर आता येत्या दोन दिवसांमध्ये महापालिकेच्या संकेतस्थळावर या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सरळसेवा भरती प्रक्रिया करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याबाबतचा शासन आदेश आहे. त्यानुसार उमेदवारांना मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्न विचारण्यात यावेत असे आदेश होते. त्यानुसार प्रश्न विचारण्यात आले आहेत.
– बाळासाहेब खांडेकर, सहायक आयुक्त, प्रशासन विभाग