सातारा, (प्रतिनिधी)- जिल्हास्तरावर साठा करण्यात आलेल्या ईव्हीएमचे विधानसभा मतदारसंघ वितरण आजपासून सुरु झाले. जिल्ह्यातील 8 मतदारसंघांसाठी आज 7 हजार 448 ईव्हीएम आणि 4 हजार 364 कंट्रोल युनिट, 4 हजार 488 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. यांचे वितरणाची प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम युनिटची पहिली सरमिसळ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज केली.
यातील फलटण, कोरेगाव या विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 45 टक्के बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि 49 टक्के व्हीव्हीपॅट यांचे वितरण करण्यात येणार आहे. तर कराड दक्षिण, कराड उत्तर या दोन विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 45 टक्के बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट तर 48 टक्के व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात येणार आहे.
वाई, माण या दोन विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 44 टक्के बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि 49 टक्के व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात येणार आहे. तर फलटण आणि सातारा या दोन विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 44 टक्के बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि 48 टक्के व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात येणार आहे. उर्वरित बॅलेट युनिटचा साठा धान्य गोदामामध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले ईव्हीएम, कंट्रोल युनिट, तसेच व्हीव्हीपॅट मशिन सातारा येथील धान्य गोदामात ठेवण्यात आलेल्या आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदार होणार आहे. ईव्हीएमवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नसावा, त्याचे वितरण पारदर्शक पध्दतीने व्हावे, यासाठी सरमिसळ पध्दत अवलंबिण्यात येते, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
आपत्कालीन परिस्थितीत ईव्हीएम, कंट्रोल युनिट, आणि व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्यास अतिरिक्त मशिनची सोयही करण्यात येते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, ईव्हीएमचे नोडल अधिकारी अभिषेक देशमुख, निवडणूक नायब तहसीलदार अनिल जाधव आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.