घोडगंगा कारखान्यावर एकहाती सत्ता : विरोधी क्रांती पॅनलचा दारुण पराभव
20 जागांवर एकतर्फी विजय : शिरूर तालुक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष
मांडवगण फराटा – शिरूर तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था असलेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनलने 20 जागा तर शेतकरी सभासद पुरस्कृत घोडगंगा किसान क्रांती पॅनेलला अतितटीच्या लढतीत एका जागेवर समाधान मानावे लागले. निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे घोडगंगाच्या निवडणुकीत शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्यावर पुन्हा एकदा मतदारांनी शिक्कामोर्तब व्यक्त केला. आमदार पवार यांचे चिरंजीव ऋषीराज पवार हे दुर्बल घटकातून बिनविरोध निवडून आले होते.
सोमवार (दि.7) सकाळी नऊ वाजता न्हावरे फाटा येथील कानिफनाथ मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरवात झाली. पहिल्यांदा मांडवगण फराटा, वडगाव रासाई, इनामगाव या गटातील मतमोजणी करण्यात आली. यात शेतकरी पॅनलचे विद्यमान अध्यक्ष अशोक पवार, उमेश साठे, नरेंद्र माने, सचिन मचाले, संभाजी फराटे तर घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या दादा पाटील फराटे यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली होती तर दुसऱ्या फेरीत सर्व उमेदवारांची आघाडी कायम राहिल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
निवडणुकीत शेतकरी पॅनेल व भाजप पुरस्कृत घोडगंगा किसान क्रांती पॅनल या दोन गटात सरळ लढत होते. ही निवडणूक चुरशीची करण्यासाठी किसान क्रांती पॅनलने उसाला तीन हजार बाजारभाव अशी घोषणा केली होती. तर शेतकरी पॅनलचे आमदार अशोक पवार यांच्यावर मोठी टीका पॅनलने केली होती. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल असे वाटत होते.
राष्ट्रवादीच्या वतीने अजित पवार यांची तर भाजपच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मांडवगण येथे सभा झाल्याने निवडणुकीत रंगात आली होती. मतमोजणीच्या वेळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
हा विजय माझा एकट्याचा नसून सर्वसामान्य सभासदांचा आहे. निवडणूक काळात विरोधकांनी खालच्या पातळीवर टीका केल्याने मतदारांनी त्यांना नाकारले.
– ऍड. अशोक पवार, आमदार, शिरूर-हवेली
आमदार पुत्राची दमदार एंट्री
घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात पिता- पुत्रांची दमदार एंट्री झाल्याने एकाच सभागृहात पिता पुत्र एकत्र काम करताना दिसणार आहेत. रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पिता- पुत्रांना एकाच वेळी संचालकदी विराजमान होण्याचा बहुमान मिळणार आहे. रावसाहेब पवार व अशोक पवार यांच्यानंतर ऋषीराज पवार ही तिसरी पिढी राजकारणात प्रवेश करीत आहे.
विजयी उमेदवार व मते
गट क्रमांक 1 – मांडवगण फराटा : संभाजी शिवाजी फराटे (7180), दादासाहेब गणपत फराटे (6938). गट क्रमांक-2 इनामगाव : सचिन बाबासाहेब मचाले (7768), नरेंद्र आण्णासाहेब माने (7452). गट क्रमांक -3 वडगाव रासाई : अशोक रावसाहेब पवार (8172), उमेश सुदाम साठे (7409). गट क्रमांक -4 न्हावरे ः संजय ज्ञानदेव काळे (7826), शरद मोहनराव निंबाळकर (7732), मानसिंग सीताराम कोरेकर (7639). गट क्रमांक 5- तळेगाव ढमढेरे ः सोपान वाल्मिकराव गवारी (7686), विश्वास रामकृष्ण ढमढेरे (7362), पोपट रामदास भुजबळ (7136). गट क्रमांक 6 – शिरूर ः वाल्मिक धोंडिबा कुरुंदळे (7619), सुहास नारायण थोरात (7417), प्रभाकर नारायण पाचुंदकर (6378). महिला राखीव ः मंगल सुहास कोंडे (7645), वैशाली सुनील जगताप (7551). अनुसूचित जाती जमाती ः उत्तम रामचंद्र सोनवणे (7614). इतर मागास प्रवर्ग ः शिवाजी मुक्ताजी गदादे (7426). भटक्या विमुक्त जाती जमाती ः बिरा बाबू शेंडगे (7201).