अहमदाबाद – करोनाबाधितांच्या संख्येत गुजरातनेही शुक्रवारी 1 हजारचा टप्पा ओलांडला. तो टप्पा पार करणारे गुजरात हे देशातील सहावे राज्य ठरले आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली, तमिळनाडू, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही 1 हजारहून अधिक करोनाबाधितांची नोंद झाली आहे.
आता त्या यादीत गुजरातचाही समावेश झाला आहे. त्या राज्यातील अहमदाबाद, वडोदरा, सुरत, राजकोट आणि भावनगर या पाच जिल्ह्यांत करोनाचा सर्वांधिक फैलाव झाला आहे. एकट्या अहमदाबाद जिल्ह्यात गुजरातमधील निम्मे करोनाबाधित आढळले आहेत. त्या राज्यातील 74 रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनशी संबंधित नियम-निर्बंधांची बारकाईने अंमलबजावणी करण्यासाठी आता गुजरातमधील यंत्रणा सरसावल्या आहेत.