नवी दिल्ली – युरोपीय आणि आफ्रिकी देशांचे दूत उद्यापासून (बुधवार) जम्मू-काश्मीरचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. विकासकामे आणि सुरक्षास्थितीचा आढावा घेण्यासाठी तो दौरा निश्चित करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल केला. विकासासाठी ते पाऊल उचलण्यात आल्याची भूमिका सरकारकडून मांडण्यात आली. मात्र, त्या पाऊलामुळे काश्मीरवर वाकडी नजर ठेवणाऱ्या पाकिस्तानची अस्वस्थता वाढली. त्यातून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारतविरोधी कांगावा सुरू केला. त्याला उत्तर म्हणून सरकारने परदेशी दूतांच्या दौऱ्याचे आयोजन केले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडेच जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुका सुरळितपणे पार पडल्या. त्यापार्श्वभूमीवर, परदेशी दूतांच्या दौऱ्याला महत्व आहे. जम्मू-काश्मीरात लोकशाहीची निश्चिती करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती परदेशी दूतांना देण्यात येईल. त्यासाठी जिल्हा विकास परिषदांचे काही नवनियुक्त सदस्य आणि महत्वाच्या नागरिकांशी त्यांचा संवाद घडवून आणला जाणार आहे. याआधी मागील वर्षी 17 देशांच्या दुतांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश होता.