आर्थिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कनिष्ठ शास्त्रज्ञाच्या घरावर छापा टाकला, यावेळी 30 लाख रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे 7 कोटी रुपयांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा मोठ्याप्रमाणात अनधिकृत मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
सुशील कुमार मिश्रा असे या शास्त्रज्ञाचे नाव असून सतना शहरातील मारुती नगर येथील घरावर छापेमारी करण्यात आली आहे. याबाबत एसपी वीरेंद्र जैन यांनी माहिती देताना सांगितले की, शोध वॉरंट मिळाल्यानंतर, ईओडब्ल्यू टीमने सतना जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कनिष्ठ शास्त्रज्ञ सुशील मिश्रा यांच्या मारुती नगर, सतना येथील घराची झडती घेतली. यावेळी मिश्रा यांच्या घरात मोठे घबाड मिळाले.
यामध्ये 30 लाख 30 हजार 880 रोख रक्कम, 10 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, 21 बँक खाती, 4 विमा पॉलिसी आणि सुमारे 1.76 कोटी रुपये किमतीचे 29 भू-रजिस्ट्री कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ही जमीन मिश्रा याने स्वत:, पत्नी सुमन मिश्रा आणि मुलगा ज्ञानेंद्र मिश्रा यांच्या नावावर सतना शहर आणि शहरालगतच्या परिसरात घेतली होती. याशिवाय भोपाळच्या जमिनींची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
आरोपीचे मारुती नगरमध्ये दुमजली घर आहे, ज्याची किंमत अंदाजे 37.50 लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. माश्राचे सतना शहराजवळ सात एकरांचे फार्महाऊस असून त्यात 1500 स्क्वेअर फूटमध्ये घर बांधले आहे. तसेच एक ट्रॅक्टर, एक महिंद्रा एसयूव्ही, एक स्कॉर्पिओ, एक इंडिका कार, 3 मोटारसायकली आणि इतर कागदपत्रे सापडली आहेत. या वाहनांची किंमत 50 लाखांहून अधिक आहे.