नारायणगाव- ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, पुणे, वाणिज्य विभाग आणि संशोधन केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता परिचय कार्यक्रम वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे हेमंत भागवत हे उपस्थित होते. त्यांनी गरज, नेतृत्व आणि प्रेरणा यांची उद्योग-व्यवसायात सांगड कशी घालावी व व्यावसायिक संधी कोणत्या व कशा ओळखाव्या, व्यवसायासाठी आवश्यक असणारे गुण कोणते असावेत, या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे या कार्यशाळेत लघुउद्योग कसा स्थापन करावा व व्यवस्थापन कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सेंट-अत्तर मेकिंग वर्कशॉप घेण्यात आला, त्याचप्रमाणे विविध व्यावसायिक संधी म्हणून मुखवासाचे पदार्थ, मसाला पान, फिनेल तयार करणे, लिक्विड साबण तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
तिसऱ्या दिवशी व्यवसायासाठी लागणारा प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा व उत्पादित वस्तूंचे विपणन कसे करायचे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. एस. डी. टाकळकर, वाणिज्य संशोधन केंद्र प्रमुख डॉ. जे. पी. भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत शेवाळे, उपप्राचार्य जी. बी. होले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. विनोद पाटे, प्रा. डॉ आबा जगदाळे, प्रा. पूर्वा साने व प्रा. गौरी शेटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ए. आर. घुमटकर, प्रा. वैशाली मोढवे, प्रा. डॉ. सारिका जगदाळे यांनी केले. प्रा. मधुरा काळभोर व प्रा. सविता खरात यांनी आभार मानले.