डेहराडून – उत्तराखंड राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. चामोली जिल्ह्यातील गोविंदघाटमध्ये पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. गोविंदघाटामध्ये भूस्खलनामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली १२ गाड्या अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आणि ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. सध्या या भागात राज्यातील आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे. यासंदर्भात बोलताना चामोली जिल्ह्याच्या दंडाधिकारी स्वाती भदोरिया म्हणाल्या की ” आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, या जिल्ह्यातीलच थरली भागात २ नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे जनावरांचे गोठे उद्धवस्त झाले आहेत.” या सर्व घटनांमध्ये कोणत्याही जिवितहानीची नोंद अद्याप करण्यात आलेली नाही.
राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी चामोली आणि पिथोरगडच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. याबरोबरच नागरिकांना योग्य ती मदत करण्याचे आदेश रावत यांनी प्रशासनाला दिले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती त्यांनी घेतली आहे.