वारजे – पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन पुन्हा निवडून येण्याची स्वप्ने पाहणाऱ्या वारजे भागातील नगरसेवकांना सुशोभीकरणाची कामे म्हणजे प्रभागाचा सर्वांगिण विकास वाटत असला तरी वारजे भागातील अनेक समस्या कायम असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यमान नगरसेवकांनी मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केली असल्याची भावना परिसरातील नागरिकांमध्ये आहे.
महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामध्ये परिसरातील वाहतूक कोंडीचा विचार करून आकाशनगर, शिवणे-खराडी रस्ता आणि मुख्य वारजे-शिवणे रस्ता असे तीन पर्यायी रस्ते दिलेले असतानाही 20 वर्ष सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी यावर कोणताही उपाय सुचविलेला नाही. या उलट काही नगरसेवकांकडून मुख्य रस्ते अडवण्याची अनोखी प्रथा वारजे परिसरात दिसून येत असल्याचे नागरिक सांगतात. विकासकामांबाबत नगरसेवकांमध्ये सुरू असलेली स्पर्धा फक्त फलकांवर दिसून येते. तर, मुख्य समस्यांकडे मात्र दुर्लक्षच आहे. या स्पर्धेतूनच पुणे महानगरपालिकेच्या निधीचा अपव्यय करून मुख्यपुलाखाली बनवण्यात आलेली उद्याने देखभाली अभावी “पांढरा हत्ती’ ठरू लागली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वारजे परिसरातील रस्त्यांची स्थिती…
वारजेमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीसह अन्य समस्यांकडे दुर्लक्ष करून नगरसेवक राहत असलेल्या ठिकाणचा परिसर सुशोभिकरण करण्यासाठी निधी आणला जात आहे. महापालिकेमध्ये वारजे समाविष्ट होऊन 27 वर्ष झाली असताना येथील अरूंद रस्त्यांचा प्रश्न मोठा आहे. वारजे मुख्य हायवे चौकापासून एनडीएकडे जाणारा रस्ता बऱ्याच वर्षांपासून रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे तसेच मुख्य हायवे रस्त्यालगतचा सेवा रस्ता अजूनही अर्धवट स्थितीत असल्याने, हे चार पदरी रस्ते शासनाकडून मंजूर असूनही सध्या परिस्थितीमध्ये दोन पदरी रस्तेही वापरण्यासाठी उपलब्ध नाहीत. मुख्य हायवे व मुख्य रस्त्यांना एकही सार्वजनिक शौचालय नाही.